बीड, 19 जानेवारी : आंबेजोगाई मधील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड यांचा शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. परळी वेस येथे झालेल्या भांडणात तीक्ष्ण हत्यारांच्या साह्याने जोगदंड यांच्यावर वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विजय जोगदंड यांना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांच्यावर अंबाजोगाई शहरातील रविवार पेठेतील पाण्याच्या टाकीजवळ अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या केली. हल्ला केल्यानंतर आरोपी तिथून फरार झाले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र अद्याप आरोपींचा शोध लागला नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
नगरसेवक विजय जोगदंड यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाली की यामागे आणखी काही कारण आहे, याबाबत पोलीसांचा तपास सुरू आहे. मात्र ही हत्या परळी वेस इथं झालेल्या भांडणातून झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, या हत्येनंतर आंबेजोगाई परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या गंभीर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. शहरात नगरसेवकाचा खून होतं असेल तर कायद्याचं भय उरलं आहे की नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours