सातारा, 27 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह एकाच गाडीतून प्रवास केला आहे. मनोमिलन घडवण्यासाठी पवार यांनी या दोघांना सोबत घेतलं असल्याची माहिती आहे. 

साताऱ्यातील खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे या दोन भावांमधील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. साताऱ्यातील एका रूग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी शरद पवार साताऱ्यात आले असताना स्वागतासाठी आलेल्या दोन्ही राजेंना पवारांनी खुणावून गाडीत बसण्यास सांगितले. उदयनराजे, शिवेंद्रराजे आणि पवार असे तिघे गाडीत बसले. तसंच त्याच वेळी शशिकांत शिंदेनाही पवारांनी गाडीत बसण्यास सांगितले. त्यानंतर हे चारही नेते एकत्र सर्किट हाऊसपासून उद्घाटन स्थळापर्यंत आले.
गाडीतून येताना शरद पवार यांनी दोन्ही राजेंना मनोमिलनाबाबत सल्ला दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यानंतर पवार यांनी केलेल्या या प्रयत्नाला किती यश येते हे पाहावं लागेल.
राज्यभरातील लोकसभा मतदासंघात साताऱ्याची जागा सर्वात जास्त चर्चेत आहे. कारण या जागेवर विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम आहे. यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत साताऱ्याच्या उमेदवाराबाबत एक वक्तव्य केलं होतं.
सातारा आणि कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असावा, याबाबत निर्णय झाला आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली. पण नक्की कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, हे मात्र पवारांनी सांगितलं नाही. नेहमीप्रमाणे चाणाक्ष शरद पवार यांनी आपले पत्ते इतक्यात उघडे करण्यास नकार दिला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours