मुंबई, 08 जानेवारी : आज सर्वसामान्य जनतेला वेगवेगळ्या संपांचा सामना करावा लागणार आहे. कारण सुधारित वेतन करार, सानुग्रह अनुदान आदी मुद्द्यांवर बेस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. मुंबईकरांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे.
तर दुसरीकडे खासगीकरणाला विरोधासह वीज कर्मचारी 72 तासांच्या संपावर गेले आहे. आज आणि उद्या बँक कर्मचारीदेखील संपावर आहेत. त्याचा फटका देशातील बँकांच्या व्यवहारास बसण्याची शक्यता आहे.
बेस्टचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेल्यानं  मुंबईत बेस्ट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी सकाळीचं कामावर निघालेल्या मुंबईकर चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत. काल बेस्टच्या व्यवस्थापनानं बोलावलेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे हे बंदचं हत्यार उपसण्यात आलं.
या संपात 30 हजार कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी केला आहे. देशभरातील वाहतूक कर्मचारीदेखील आजपासून दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत.
कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात यावी तसंच दरमहिना 24 हजार रुपये किमान वेतन मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी वाहतूक कर्मचाऱ्यांनी हे संपाचं हत्यार उपसलं आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीला समोरं जावं लागणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours