नागपूर, 25 फेब्रुवारी : प्रेमप्रकरणातून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना नागपूरच्या नंदनवन परिसरात घडली आहे. राहुल तुरकेल असं मृत 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे. रितेश सिकरवार या व्यक्तीने डोक्यात हातोडी घालून त्याचा खून केला आहे.
राहुल हा महानगर पालिकेत स्वच्छता कर्मचारी होता आणि त्याने प्रेमप्रकरणातून एका तरुणीसोबत लग्न केले होते. याच तरुणीसोबत आरोपी रितेश सिकरवार याचे काही वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. पण नंतर त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. यातून रितेश याने आपल्या प्रेयसीसोबत लग्न करणाऱ्या राहुल याला संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला आपल्या घरी बोलावले. रितेशने राहुलला आपण आधी पुजा करू असे सांगितले.
त्यातच राहुलला काही तरी बरेवाईट होईल याची चाहुल लागली. यातून झालेल्या वादातून रितेशने राहुलवर हातोडीने वार केले. त्यात तो जागीच ठार झाला. यानंतर रितेशने मृतदेहाजवळ अघोरी पूजा केली. तसंच मृतदेहाच्या कपाळावर कुंकू लावले आणि बुंदीच्या लाडूही मृतदेहाजवळ ठेवला.
पोलिसांनी मृतदेहाजवळून पुजेचे साहित्य आणि लिंबू-मिर्च्या असे अघोरी प्रथेसाठी अंधश्रद्धेसाठी वापरल्या जाणारे साहित्य जप्त केले आहे. दरम्यान रितेशने राहुलची हत्या केल्यानंतर आपल्या घरीच कुलूप लावून निघून गेला. रितेशचे वडील घरी आल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला तेव्हा रितेशचा शोध घेतला असता त्याने सर्व घटनाक्रम सांगितला आणि आपल्या कृत्याची कबुली दिली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours