मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारपासून पुणे , कोल्हापूर , कोकण या ठिकाणी विविध कार्यक्रमासाठी जाणार आहेत. हे कार्यक्रम आटपून आल्यानंतर म्हणजेच साधारणत: पुढच्या आठवड्यात राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत मनसेची नेमकी काय भूमिका असेल हे जाहीर करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
लोकसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. पण राज ठाकरे यांच्या मनसेची निवडणुकीबाबतची दिशा अद्याप स्पष्ट झालेली नाही. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता होती. पण अजूनही कोणताही निर्णय समोर आला नसून मनसेत अजूनही संभ्रमाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, शिवसेना आणि भाजपने नुकतीच युतीची घोषणा केली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही अंतिम टप्प्यात आहे. अशातच लोकसभा निवडणुकीबाबत मनसेकडून मात्र अजूनही कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही.
भाजप-सेना युतीची घोषणा
नाही नाही म्हणता म्हणता अखेर भाजप आणि शिवसेना मिळून लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकी एकत्र लढणार आहे. लोकसभेसाठी भाजपकडे 25 जागा तर शिवसेनेकडे 23 जागा राहणार आहेत. तर विधानसभेसाठी भाजपकडे 144 तर शिवसेनेकडे 144 जागा असतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली. हिंदुत्व, देशावरचं दहशतवादाचं संकट अशा अनेक कारणांचा हवाला देत भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र लढणार असल्याचं दोनही नेत्यांनी सांगितलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours