नागपूर, 16 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा भंग होऊ नये, मतदारांना प्रलोभन दिले जाऊ नये, यासाठी पोलीस प्रत्येक हालचालींवर नजर ठेऊन आहेत. या पार्श्वभूमीवर, नागपूरच्या सावनेर परिसरातून 80 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर नेत्रावती एक्स्प्रेसमधून 532 दारूच्या बाटल्याही तपास पथकाने ताब्यात घेतल्या आहेत.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या केळवद सीमेवर निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने दोन कारवाया केल्या. यामध्ये 80 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावनेर तालुक्यात केळवद, सिंरोजी आणि खुर्सापार या तीन सीमेवर सावनेर तहसील कार्यालयाने निवडणूक स्थायी तपासणी पथक नेमलं आहे. यात रामटेक लोकसभा क्षेत्रात मोडणाऱ्या मध्य प्रदेशातील केळवद सीमेलगतच्या पथकाला दोन गाड्या तासाभराच्या फरकात संशयास्पद आढळल्या. दोन्ही होंडा सिटी कारमध्ये प्रत्येकी 30 आणि 50 लाख रूपये अशी एकूण 80 लाख रुपयांची रक्कम आढळून आली. जप्त करण्यात आलेली रक्कम उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात आलेली आहे.
शुक्रवारी (15 मार्च)दुपारी 2.30 वाजण्याच्या दरम्यान महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर निवडणूक विभागाच्या पथकाला होंडा सिटी कार क्रमांक एम.एच.49 बी.बी.0801 मध्ये 30 लाख रुपये रोख रक्कम आढळली. तपास पथकातील अधिकाऱ्यांनी सौसर येथून येणाऱ्या निळ्या रंगाच्या होंडा सिटी कारची तपासणी केली असता, कारच्या डिक्कीत पांढऱ्या-गुलाबी रंगाची नायलॉनची पशू आहाराची बॅग सापडली. या बॅगमध्ये
500 रुपयांच्या 2 हजार नोटा = 10 लाख रूपये
100 रुपयांच्या 1 हजार 800 नोटा = 18 लाख रूपये
20 रुपयांच्या 5 हजार नोटा = 1 लाख रूपये
10 रुपयांच्या 10 हजार नोटा = 1लाख रूपये
अशी एकूण 30 लाखांची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम जप्त करून पथकाने गाडी पलाश माहेश्वरी यांच्या ताब्यात दिली. ही रक्कम राजेंद्र जितमल सावलाकडून जप्त करण्यात आली. या कारवाईच्या एक तासानंतर सौंसरकडून एम.एच.31 ए.जी.6961 पांढऱ्या रंगाची होंडा सिटी कारवर पथकानं कारवाई केली. या कारमध्ये पथकाला 50 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली.
Post A Comment:
0 comments so far,add yours