मुंबई, 15 मार्च : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन (CSMT) परिसरात झालेल्या पूल दुर्घटनेवरून मुंबई महापालिकेवर चहुबाजूंनी टीका होत आहे. गुरुवारी (14 मार्च)संध्याकाळच्या सुमारास झालेल्या सीएसएमटी पूल दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवरून नितेश राणेंनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना यांच्यावर निशाणा साधला आहे. 'पेंग्विनकडे विशेष लक्ष आणि नाईट लाईफचा मुद्दा लावून धरण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महापालिका का करत नाही?', असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
'पुन्हा तेच आरोप-प्रत्यारोप आणि पुलाचे ऑडिट करण्याच्या घोषणा होतील, पण ठोस उपाययोजना काहीच होणार नाही. सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेला नागरिकांच्या आयुष्याची काहीच किंमत नाही का?', असा हल्लाबोल करत नितेश राणेंनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला हाणला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन परिसरातील पादचारी पुलाचा भाग गुरुवारी (14 मार्च)संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळेस कोसळल्यानं भीषण दुर्घटना घडली. या घटनेत तीन महिलांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 34 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours