मुंबई, 28 मार्च : भाजपच्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. मुंबईतील अन्य मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणाऱ्या भाजपनं किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीसंदर्भात सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यातच किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा जोरदार विरोध आहे. यामुळेच ईशान्य मुंबई मतदार संघातील उमेदवारी जाहीर करण्यास उशीर होत असल्याचं म्हटलं जात आहे. यातच प्रवीण छेडा यांनी गेल्याच आठवड्यात भाजपप्रवेश केल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहे. ईशान्य मुंबई मतदार संघातील संभाव्य उमेदवार म्हणून छेडा यांच्याकडे पाहिलं जात आहे. यादरम्यान छेडा यांनी बुधवारी (27 मार्च) मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेटीदरम्यान नेमकं काय घडलं? याबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण या भेटीमुळे ईशान्य मुंबईच्या जागेसाठी इच्छुकांचं मातोश्रीवर लॉबिंग सुरू झाल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येऊ लागल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, या सर्व राजकीय घडामोडींदरम्यान आता रेल्वे मंत्री पियूष गोयल यांचंही नाव चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर दुसरीकडे भाजपतून मनोज कोटक, पराग शाह, प्रकाश मेहता यांचीही नावं चर्चेत आहेत. पण किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार कायम आहे.  मंगळवारी (26 मार्च) शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी किरीट सौमय्या यांच्या उमेदवारीला थेट मुख्यमंत्र्यांसमोर विरोध दर्शवला. एकूणच प्रवीण छेडा यांच्या मातोश्री वारीने ईशान्य मुंबईसाठी चुरस वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
यामुळे शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांना विरोध

2017 मधील मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान तसंच यापूर्वीही किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेनेवर अनेकदा टक्केवारी घेण्यावरून टीका करण्यात आली होती. मुंबई महापालिकेत टक्केवारी घेतल्याशिवाय कोणतेही काम दिले जात आहे. वांद्र्यांच्या साहेबांना टक्केवारी जाते, असा थेट आरोप मातोश्रीवर केल्याने किरीट सोमय्यांविरोधात शिवसैनिकांची तीव्र नाराजी आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours