मुंबई, 30 एप्रिल : लोकसभा निवडणूक 2019साठी टाटा समूहाने 500 ते 600 कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सगळ्यात जास्त निधी हा भारतीय जनता पक्षाला देण्यात आला आहे. एकूण रक्कमेतील अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा हा भाजपला देण्यात आला असल्याचं म्हटलं जात आहे.
एका बिजनेस स्टँडर्डकडून यासंदर्भात रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. टाटा समूहाने 2019मध्ये राजकीय पक्षाला जो निधी दिला तो 2014मध्ये दिलेल्या निधीपेक्षा 20 पटीनं जास्त आहे. 2014मध्ये टाटा समूहाने सर्व पक्षांना एकूण 25.11 कोटी रुपये निधी निवडणुकांसाठी दिला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकांसाठी राजकीय पक्षांना निधी देण्यासाठी एक विशेष ट्रस्ट बनवलं आहे. ज्याचं नाव 'प्रोग्रेसिव इलेक्टोरल ट्रस्ट' आहे.
काँग्रेस पक्षासाठी फक्त 50 कोटींचा निधी
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा समूहाने भाजपला 300 ते 350 कोटी रुपयांचा निधी निवडणुकांसाठी दिला आहे. तर काँग्रेस पक्षाला फक्त 50 कोटी रुपयांचा निधी निवडणुकीसाठी देण्यात आला आहे. उरलेला निधी हा टीएमसी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सीपीआयएम आणि एनसीपीसारख्या पक्षांना देण्यात आला आहे.
ज्यांच्या जास्त जागा त्यांना जास्त निधी
टाटा समुहानुसार, ज्या पक्षाच्या जास्त जागा असणार त्या पक्षाला जास्त निधी दिला जाईल. त्यामुळे भाजप पक्षाला सगळ्यात जास्त निधी देण्यात आला आहे. समूहाने दिलेल्या माहितीनुसार, टाटाच्या सर्व कंपन्या आपला पैसा प्रोग्रेसिव इलेक्टोरल ट्रस्टमध्ये जमा करतात. त्यानंतर कोणत्या पक्षाला किती निधी द्यायचा याचा निर्णय ट्रस्टकडून घेतला जातो. यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त योगदान टाटा कंपनीच्या टीसीएसनं दिलं आहे. त्यांनी एकूण 220 कोटी रुपये ट्रस्टमध्ये जमा केले होते.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours