मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईच्या बड्या लढतींकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबतच शिवसेनेच्या उमेदवारांना मोदी लाटेचा फायदा मिळाला होता. पण यावेळी मात्र युतीला आघाडी जोरदार टक्कर देणार, अशी चर्चा होती.
संमिश्र मतदारसंघ 
उच्चभ्रू आणि गरीब असे दोन्ही मतदार असलेल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात युतीच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांची लढत काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्याशी होती. पूनम महाजन या भाजयुमोच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे भाजपचं संघटनात्मक पाठबळ आहे. त्यांनी आतापर्यंत केलेलं काम पुस्तिका काढून मतदारांपर्यंत पोहोचवलं होतं. तरीही नोटबंदी, जीएसटी यासारखे भाजप सरकारच्या विरोधात जाणारे मुद्दे हे त्यांच्यासमोरही आव्हान होते.
प्रिया दत्त उशिरा रिंगणात
दुसरीकडे प्रिया दत्त यांनी इथून निवडणूक लढवण्याचा निर्णय उशिरा घेतला. काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसू शकतो, अशी चर्चा होती. कुर्ला, बांद्रा, विलेपार्ले अशा भागात मतदारांशी या दोन्ही उमेदवारांनी किती संपर्क साधला यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. मुंबईमधली ही लढत दोन महिला उमेदवारांमधली असल्याने या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 
या लोकसभा मतदारसंघात वांद्रे पश्चिम, विलेपार्ले, कुर्ला, कलिना, चांदिवली,वांद्रे पूर्व हे विधानसभा मतदारसंघ येतात. मागच्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours