खंडाळा, 1 जुलै: मुंबई शहर आणि परिसरात गेल्या 2 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच सोमवारी पहाटे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर एका मालगाडीचे डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वेची पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका मालगाडीचे 15 ते 16 डबे मंकिहिल ते जामरुंग केबिन दरम्यान घसरले. यामुळे मध्य रेल्वेची मिडल लाईन तसेच डाऊन लाईन पूर्णपणे बंद झाल्याचे मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे. मालगाडीचे डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र जोपर्यंत डबे हटवले जात नाहीत तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहील.
पावसामुळे रेल्वे वाहतूक देखील उशिराच सुरु आहे. त्याचा फटका लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांना बसत आहे. अशातच खंडाळ्याजवळ सोमवारी पहाटे साडे चारच्या सुमारास मालगाडीचे डबे घसरले. यामुळे मध्य रेल्वेची पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद झाली आहे. या अपघातामुळे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या अनेक लांब मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
या परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे रेल्वे रुळाला तडे गेल्याने ही घटना घडली असावी असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. घसरलेले डबे हटवण्यासाठी टुल व्हॅन (विशेष रेल्वे) घटनास्थळी दाखल झाली आहे. मार्ग मोकळा करण्यासाठी 200 ते 250 कर्मचारी काम करत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours