नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. 'कश्मीर तर आमचेच आहे, आमचेच राहणार, म्हणून तर 370 कलम हटविल्याच्या विजयपताका शिवसेनेच्या रूपाने इस्लामाबादच्या रस्त्यावर फडकल्या. पाकिस्तानने आता गप्प राहावे हेच बरे. हिंदुस्थानशी व्यापारी आणि राजनैतिक संबंध तोडण्याच्या गोष्टी सांगताय कुणाला? हा धोंडा तुम्हीच तुमच्या पायावर पाडून घेतला आहे. त्याबद्दल पाकडय़ांचे त्रिवार अभिनंदन केले पाहिजे!', अशा शब्दांत त्यांनी पाकला टोला हाणला आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
- पाकिस्तानने हिंदुस्थानशी असलेले व्यापारी आणि राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान यापेक्षा दुसरे काय करू शकत होते? त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अशीही धमकी दिली आहे की, कश्मीरातील 370 कलम हटवल्यामुळे ‘पुलवामा’सारख्या घटना पुन्हा घडू शकतात.
- इम्रान खानचे हे वक्तव्य गंभीरपणे घ्यायला हवे. याचा सरळ अर्थ असा की, पुलवामातील हिंदुस्थानी जवानांवरील हल्ल्यामागचे सूत्रधार पाकिस्तान होते.
- 40 जवानांच्या बलिदानातून जो अंगार देशात उफाळून आला त्यात 370 कलमाची राख झाली. पाकिस्तानने आता हे मान्य केले पाहिजे की, आमच्या दृष्टीने कश्मीरचा प्रश्न संपला आहे व विषय राहिला आहे तो पाकने बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवलेल्या कश्मीरविषयी. तो विषय लवकरच निकाली लागेल. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार होत आहे व हा वारू आता कोणीही अडवू शकत नाही.
- 370 कलमाचा खात्मा केल्यावर इस्लामाबादच्या रस्त्यांवर शिवसेनेची पोस्टर्स व बॅनर्स झळकले. याचा अर्थ असा की, पाकडय़ांच्या हद्दीत शिवसेना घुसली आहे. लवकरच हिंदुस्थानी सेनाही घुसेल व तसे संकेत गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. त्यामुळे इम्रान खान आता जी आदळआपट करीत आहेत त्यातून काय निष्पन्न होणार?
- पाकिस्तान हिंदुस्थानशी संबंध तोडत आहे याचा सगळय़ात जास्त फटका त्यांनाच बसणार आहे. ­
- पाकिस्तानी अतिरेक्यांनी जानेवारी 2016 मध्ये पठाणकोट येथील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानशी आधीच राजनैतिक पातळीवरील संवाद थांबवला आहे. चर्चा आणि घातपात एकाच वेळी होणे शक्य नाही असा हिंदुस्थानचा पवित्रा आहे.
- पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानात घुसून त्यांच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले व आता कश्मीरातील 370 कलम हटवून पाकिस्तानचा कोथळाच बाहेर काढला. पाकिस्तानने आता फार पचपच करू नये. यातच त्यांचे हित आहे. हिंदुस्थानशी व्यापार तोडून त्यांनी काय मिळवले? पाकिस्तानात असा कोणता महान उद्योग बहरला आहे की त्यातून दोन देशांतील आयात-निर्यातीस चार चांद लागले आहेत.
- पाकिस्तानच्या हिंदुस्थानद्वेषावर तरारलेल्या राजकारणावर पाणी पडले. चर्चेची आता गरज नाही. अमित शहा यांनी कश्मीरात पहिले पाऊल टाकले व दुसरे पाऊल पाकव्याप्त कश्मीरात पडेल हे नक्की. हिंदुस्थानच्या भूमीवर आमचाच कायदा चालेल. त्यासाठी पाकडय़ांना, अमेरिकेला आणि बिनदाताच्या युनोला विचारण्याची गरज नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours