मुंबई, 09 ऑगस्ट : कोल्हापूर, साताऱ्यासह पुण्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोल्हापूर, सांगलीमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे. या भागात 204 मिमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 48 तासांत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महापुराचा सामना करणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
बंगालच्या उपसागर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा पुरामुळे जलमय झाला आहे. प्रशासनाकडून मोठं रेस्क्यू ऑपरेशन प्रत्येक गावात सुरू आहे. पावसाचा जोर हलका कमी झाला असला तरी पुराचं पाणी अद्याप गावात तसंच आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाचा धोका वाढत आहे.
मुंबईकडे पावसाची पाठ
एककीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसामुळे आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी मुंबईकडे मात्र पावसाने पाठ फिरवली गेली. गेल्या 2 दिवसामध्ये मुंबईत पावसाचा जोर कमी झाला आहे. दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांवरही होणार आहे. या जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातही मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव, जालना, परभणी, हिंगोलीमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरात आता पर्यंत 27 जणांचा मृत्यू
- नंदूरबारमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं नदी-नाल्यांना पूर आला आहे. अक्कलकुवा इथं पुलावरून पाणी जात असल्याने अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्ग बंद करण्यात आला आहे. तर तळोदा तालुक्यात नदीत वाहून गेल्यानं एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
- नांदेडच्या किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या एका 18 वर्षांच्या तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. वाळकी इथला सौरभ राठोड आपल्या मित्रांसोबत धबधबा बघायला आला होता.
- राज्यातील पूर परिस्थितीवर केंद्राचं लक्ष असून पूर परिस्थिती आटोक्यात आणण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. अजुनही गरज पडली तर केंद्राची मदत मागितली जाईल असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. राज्य सरकारने पूरपरिस्थितीविषयी रिपोर्ट पाठवल्यावर त्यावर निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले.
- जळगाव जिल्ह्यातल्या सुकी नदीला पूर आलाय. रावेर परिसरातला जोरदार पावसामुळे सुकी, नागोई, मात्रण आणि नागझिरी नद्यांनाही चांगलं पाणी आलं आहे. रावेरमधल्या अनेक शाळांमध्ये पाण्याचं पाणी साचलं.
- उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदीनं रौद्ररूप धारण केलं आहे. पंढरपूर शहरातल्या भजनदास चौक, घोगंडे गल्ली, सरकारी दवाखाना, गोविंदपुरा, आंबेडकर नगर या भागात वसाहतीत पाणी शिरलं आहे. शहराच्या विविध भागातून पुरात अडकलेल्या जवळपास 1 हजारांहून अधिक कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं आहे. सोलापूरहून पंढरपूरकडे जाणारे दोन्ही पूल पाण्याखाली गेले आहेत, केवळ रेल्वे पुलावरूनच पादचारी शहरात दाखल होतायत.
- अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसर जलमय झालाय. सांगळूद इथं जलसंधारण विभागाने बांधलेल्या शेकडो एकरच्या शेततळ्यात पाणीच पाणी झालं.
- अकोल्यात वाण प्रकल्पाचे एकूण 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तेल्हारा तालुक्यात हा वाण प्रकल्प आहे. काल दुपारी 2 दरवाजे आणि संध्याकाळनंतर उशीर 2 दरवाजे उघडण्यात आले. 2000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours