मुंबई, 19 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं काँग्रेसीकरण सुरू आहे. फक्त आम्ही मोठे केलेले लोक भाजप घेत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी विकासाचा मुद्दा पुढे करून भाजप सेनेत प्रवेश केला. अशातच आता करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यादेखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 20 ऑगस्टला रश्मी बागल शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावर जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
'आम्ही मोठ्या केलेल्या नेत्यांना भाजप त्यांच्या पक्षात घेत आहे. पण त्यांच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचं काय? त्यांनी आधी त्यांच्या पक्षातील छोट्या कार्यकर्त्य़ांना मोठं करावं' अशा शब्दात जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकांमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी भाजप-शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. तशीच जोरदार इनकमिंग आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सुरू आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, 'राजकारणात रेडिमेट कपड्यांऐवजी शिवून घेणारे लोक महत्त्वाचे असतात' असा टोलाही पाटील यांनी यावेळी बोलताना लगावला. महिला आघाडीचं कोणी भाजमध्ये गेलं असलं तरी त्याचा नगण्य परिणामही आमच्या पक्षावर झाला नाही असं म्हणत त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या चित्रा वाघ यांच्यावर विधान केलं आहे. 'आमचे कार्यकर्ते कुठेही जाणार नाही. आमचे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत' असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
'आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आघाडीची चर्चा सुरू आहे. पुरामुळे चर्चा रखडली होती. पण पुन्हा चर्चा करू. 288 जागांवर सर्वच चाचपणी करत आहे. पण आघाडी झाल्यावर आम्ही एकत्र काम करू' असं जयंत पाटील म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे नेतृत्व आपल्या कामाची कदर करत नसल्याने रश्मी बागल पक्ष सोडणार आहेत, अशी माहिती त्यांचे बंधू आणि मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी दिली आहे. येत्या सोमवारी रश्मी बागल यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. आता शिवबंधन बांधण्याची वेळ आली आहे, अशी फेसबुक पोस्ट दिग्विजय बागल यांनी लिहिली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours