पुणे, 28 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही माहिती नव्हती, असा मोठा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी उदयनराजे भोसले यांच्याविषयीदेखील वक्तव्य केलं आहे. उदयनराजे गहिवरले असा प्रश्न विचारला असता 'त्यांच्या मानसिक स्थितीत मी भर टाकू इच्छित नाही. पण त्यांना दिल्लीतील गाडी आणि बंगला पाहिजे आहे. मी तो द्यायला तयार आहे' असं शरद पवार म्हणाले आहे. त्यांच्या या उत्तरामुळे एकच राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
'उदयनराजेंना दिल्लीतील गाडी, बंगला हवा आहे. तो मी देण्यासाठी तयार आहे. पण त्यांनी दिवसा बंगल्यावर यावं' असंही शरद पवार म्हणाले आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांआधीच सातारा दौरा केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले हे शरद पवार यांच्याबद्दल बोलताना भावुक झाले होते. तसंच यावेळी उदयनराजे यांना अश्रूही अनावर झाले होते .
'सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी अर्ज दाखल केला तर मी ही निवडणूक लढवणार नाही. मला शरद पवार यांच्याबद्दल खूप आदर आजही आहे,' असे भावुक उद्गार यावेळी उदयनराजेंनी काढले होते. उदयनराजे भावनिक झाल्याने सर्वच संभ्रमात पडल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावरच शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उदयनराजेंना टोला मारला आहे. त्यावर आता उदयनराजे काय उत्तर देणार याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे.
अजित पवार यांच्या राजीनाम्याविषयी काय म्हणाले शरद पवार?
या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, आज दुपारी बैठका सुरू असताना राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षाच्या नेते अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यांनी आमच्या कुणाशीही चर्चा केली नव्हती. मी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क केला तर त्यांनी दिलेलं कारण समजलं. शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी माझ्या नावाचा समावेश करण्यात आला. त्यामुळे अजित पवार हे अस्वस्थ होते. राज्यातील राजकारणाची पातळी खालावली आहे. यातून बाहेर पडावं असा सल्लाही त्यांनी आपल्या मुलाला दिला होता, असंही पवारांनी सांगितलं. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे अजित पवार नाराज झाले होते. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर चर्चा करेन, असंही पवार म्हणाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours