मुंबई, 23 सप्टेंबर : लोकसभा निवडणुकीपासून भाजपने थेट काँग्रेसच्या नेतृत्वाचीच कोंडी करण्याची रणनीती आखली. लोकसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची त्यांच्या नांदेड मतदारसंघात कोंडी केली. परिणामी चव्हाण यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही भाजपचे यादृष्टीनेच प्रयत्न सुरू आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या संगमनेर मतदारसंघात अडकवून ठेवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. भाजपच्या याच खेळीला काँग्रेसकडून आता जोरदार प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. बाळासाहेब थोरात यांनी त्याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आम्ही तगडा उमेदवार देऊ, असं म्हणत थोरातांनी काही दिवसांपूर्वीच भाजपला आव्हान दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक रंजक होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांविरोधात कोण लढवणार निवडणूक?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही हायप्रोफाईल लढतींनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. यामध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. कारण या मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसचे फायरब्रँड नेते नाना पटोले यांनी शड्डू ठोकला होता. नागपूर लोकसभेची ही निवडणूक चांगलीच रंगतदार झाली. गडकरींसाठी यंदाची निवडणूक खडतर आहे, ते पराभवाच्या छायेत आहेत, अशाही चर्चा महाराष्ट्रभर रंगल्या. पण प्रत्यक्ष निकालात मात्र गडकरींनी नाना पटोलंना चितपट केलं. असं असलं तरीही नाना पटोलेंनी घेतलेली मतेही लक्षवेधी होती.
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही नाना पटोल भाजपच्या नेतृत्वालाच टार्गेट करण्याची शक्यता आहे. विधानसभेत नाना पटोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवतील, अशी चर्चा रंगत आहे. पटोले यांनी याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र नाना पोटोलेंचा मुख्यमंत्र्यांशी सामना झाल्यास राज्याचं लक्ष नागपूरकडे वेधलं जाईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours