मुंबई, 3 सप्टेंबर : आमागी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला महाराष्ट्राच्या विविध भागात जोरदार धक्के बसत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर 'गयारामां'नी काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे. अशातच मुंबईतील एक मातब्बर काँग्रेस नेता आणि माजी मंत्री भाजपच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे.
मुंबई काँग्रेसमधील मोठे नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांची गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगलीच जवळीक वाढली आहे. त्यातच आणि गणेश दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीसांनी कृपाशंकर सिंग यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. निवडणूक तोंडावर असताना झालेल्या या भेटीने कृपाशंकर सिंग यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे.
कृपाशंकर सिॅग यांनी आधीही दिले भाजप प्रवेशाचे संकेत?
लोकसभा निवडणुकीनंतर काही दिवसांतच कृपाशंकर सिंग यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारची स्तुती करत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासूनच ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी गणपती दर्शनाच्या निमित्त का होईना त्यांच्या घरी भेट दिल्याने या चर्चांना आणखीनच उधाण आलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कृपाशंकर सिंह यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांची गुप्त भेट घेतली होती. या बैठकीत आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पुनर्वसनासंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. आमदार प्रसाद लाड यांच्याकडून मात्र ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours