मुंबई, 12 ऑक्टोबर: जर माझे शिलेदर निवडूण गेले नाही तर गडकिल्ले गेलेच, महाराष्ट्र देखील खड्ड्यात जाईल, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. मुंबईतील भांडूप येथील सभेत ते बोलत होते. माझ्या शिलेदारांच्या पोटात एक आग आहे, राग आहे आणि मी यासाठी त्यांन उभे केल्याचे राज म्हणाले.
एकेकाळी महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार फडकला होता, तो महाराष्ट्र आता गलितगात्र आला आहे. महाराष्ट्र हतबल होताना मी पाहू शक नाही, अशा शब्दात राज यांनी त्यांची मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी त्यांनी मुंबईतल्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर देखील भाष्य केले. मुंबई महापालिका जगातील पहिली महापालिका असेल जे खड्डे बुजवण्यासाठी 200 कोटी रुपये खर्च करते. जे कंत्राटदार रस्ते बांधणार त्यांनाच 200 कोटी रुपये खड्डे भरण्यासाठी दिले जातात, असे राज म्हणाले. मुंबईतील रेल्वे सुविधांचा विचार होत नसल्याचे देखील राज यांनी सागितले. जपानकडून कर्ज घेऊन बुलेट ट्रेन उभारली जात आहे. मराठी माणूस गुजरातला ढोकळा खायला जाणार का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधून सरकारने 1 लाख 70 हजार कोटी रुपये सरकार चालविण्यासाठी काढले. रिझर्व्ह बँकेतील पैसे सरकार चालवण्यासाठी वापरले तर बँकांचे काय होणार, असा प्रश्न राज यांनी विचारला.
राज ठाकरे पुढे म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत नागरिकांच्या आयुष्यातील 5 वर्ष जातात, निवडणुकीत वाट्टेल ती आश्वासनं दिली जातात आणि पुढे लोकं विसरतात, आणि लोकं पण प्रश्न विचारत नाहीत आणि इतर कुणीही सत्ताधाऱ्यांना एकही प्रश्न विचारायला तयार नाहीत की काय केलंत त्या आश्वासनांचं? गेल्या 5 वर्षात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पण सरकारला त्याचं काही नाही, अमित शाह एका सभेत बोलत होते आणि त्या सभेच्या शेजारच्या गावात त्याच वेळेला एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि अमित शाह बोलत होते कलम 370 बद्दल.
टोलमुक्त महाराष्ट्र करू असं भाजपचं जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होत? कुठे झाला टोलमुक्त महाराष्ट्र? जे टोल ७८ बंद झाले ते टोल महाराष्ट्र सैनिकांच्या दणक्यामुळे झाले. त्रिभाषासूत्र ठीक आहे पण मुंबईत चौथी भाषा आणायचा प्रयत्न कराल तर बांबू बसेल असंही त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी आणल्यानंतर मी धोक्याची सूचना दिली होती मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. आज ते सर्व धोके खरे ठरत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. आणि अशा वेळेस सरकारला प्रश्न विचारायचा कोणी? असा हतबल महाराष्ट्र मी नाही बघू शकत? अटकेपार झेंडा नेणारा महाराष्ट्र आज गलितगात्र पडलाय, थंड झालाय. महाराष्ट्राला आसपासच्या घटनांचा राग का येत नाहीये? चीड का येत नाहीये कोणाला? असा सवालही त्यांनी केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours