नाशिक, 05 ऑक्टोबर: गेल्या 5 वर्षात भाजपचा बालेकिल्ला बनलेल्या नाशिक शहरात युतीला बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे. शहरात शिवसेनेला एकही मतदारसंघ न मिळाल्यामुळे स्थानिक नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. तर भाजपनं विद्यमान आमदराला उमेदवारी नाकारल्यामुळं त्या नाराज आमदारानं थेट राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. नाशिक महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवलाय. शुक्रवारी जोरदारशक्ती प्रदर्शन करीत नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

युतीच्या जागा वाटपात शिवसेनेनं नाशिक शहरातील तीनही मतदारसंघ भाजपला आंदण दिल्यामुळं शिवसेनेत प्रचंड  असंतोषा खदखदतो आहे. त्यातूनचं हा बंडखोरीचा भडका उडाला. या मतदारसंघात शिवसेनेची मोठी  ताकद  असल्यानं शिंदे यांची बंडखोरी कायम राहिल्यास भाजप उमेदवाराच्या अडचणी वाढणार आहेत. पण केवळ नाशिक पश्चिमेत बंडखोरी झालीय असं नाही तर नाशिक पूर्व मतदारसंघतही भाजपला बंडखोराची सामना करावा लागतो आहे.
खरं तर हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.  पंचवटी आणि तपोवन या परिसरात भाजपचा परंपरागत मतदार आहे. मात्र या मतदारसंघात भाजपनं विद्यमान आमदार बाळासाहेब सानपांचा पत्ता कापून ऐनवेळी मनसेतून आयात केलेल्या राहुल ढिकलेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली.राहुल ढिकलेंना उमेदवारी जाहीर होताचं राष्ट्रवादीनं भाजपच्या नाराज बाळासाहेब सानपांना पक्षात घेत उमेदवारी दिली. शेवटच्या क्षणी छगन भुजबळांनी ही खेळी करुन भाजपला धक्का दिला.
नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातून भाजपनं पुन्हा देवयानी फरांदे यांना उमेदवारी दिल्यामुळं वसंत गीते नाराज झाले होते. मात्र  भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजनांनी  गीतेंची नाराजी दूर केलीय.त्यामुळं सध्या तरी फरांदे यांना दिलासा मिळाला असला तरी  देवळाली मतदारसंघात भाजप नगरसेविका सरोज अहिरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपला घरचा आहेर दिलाय.
या विधानसभा निवडणुकीत अर्ज भरतांना, राष्ट्रवादीनं भाजपला जोरदार धक्का दिलाय.बाळासाहेब सानप यांनी 14 भाजप नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा केल्यानं पालिकेतील भाजपच्या एकहाती सत्तेवर मोठा आघात मानला जातोय.छगन भुजबळ यांची रणनीती आज जरी यशस्वी झाली असली तरी संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन ही मोडतोड रोखण्यासाठी काय खेळी करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours