मुंबई,4 ऑक्टोबर: भाजप आणि शिवसेनेने शुक्रवारी सायंकाळी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अखेर महायुतीची घोषणा केली. महाराष्ट्राच्या मनातील युती खऱ्या अर्थाने अवतरली असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी महायुतीचा फॉर्म्युला स्पष्ट केला. भाजप 150, शिवसेना 126 तर मित्रपक्ष 14 जागांवर लढणार आहेत. काही मित्रपक्ष कुठे भाजपचे कमळ या चिन्हावर तर कुठे आपापल्या चिन्हावर लढणार आहेत.
'हिंदुत्त्व' या धाग्यामुळेच भाजप-शिवसेना- मित्रपक्ष एकत्र आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. आदित्य ठाकरे सर्वाधिक मतांनी निवडून येतील, ते विधानसभेत आमच्यासोबत बसतील, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी महायुती असल्याचे आधीच ठरले होते, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीत महायुती प्रचंड मताधिक्याने येणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अनेक जागांवर तडजोड झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील, मनोहर जोशी, आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती.
बंडखोरांना दिला हा इशारा..
तिकीट न मिळालेल्या युतीमधील काही नेते नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहेत. पुढच्या दोन दिवसांत बंडखोरांना अर्ज मागे घ्यायला लावणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तरीही ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तिकिटं कापली नाहीत तर जबाबदाऱ्या बदलल्या आहेत. काही कार्यकर्ते विधानसभेच्या बाहेर राहून पक्षाचे काम करतील. आमची चलती असल्याने सगळ्यांना भाजपचे तिकीट हवं आहे, असेही ते म्हणाले.
Post A Comment:
0 comments so far,add yours