रीपोटर.... संदीप क्षिरसागर 
 गोंदिया दि.10जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने मागील महिन्यातच देशात प्रवेश केला. त्यातच गोंदिया येथील गणेशनगरचा एक युवक 17 मार्चला थायलंड या देशातून पर्यटन करून गोंदियात पोहोचला.जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलून तो कोरोना बाधित असल्याच्या शंकेने त्याला 25 मार्चला गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. आज 10 एप्रिल रोजी त्याचा  अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्याला कोरोनामुक्त झाल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले. यावरून त्याला  आज घरी जाण्यासाठी सुट्टी देण्यात आली. 

 25 मार्चला या युवकाला गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यानंतर त्याचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.26 मार्चला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे तो कोरोना बाधित असल्याचे सिद्ध  झाले.कोरोनविषयक शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे वैद्यकीय चमू त्याच्यावर उपचार करीत होती. त्यानंतर 8 एप्रिलला दुसऱ्यांदा त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले. त्या नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर पुन्हा  तिसऱ्यावेळी 9 एप्रिलला त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. आज 10 एप्रिल रोजी त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभागाने त्याचे समुपदेशन करून सुट्टी दिली.अखेर त्या युवकाने कोरोनामुक्त होऊन कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली.

समुपदेशन आणि प्रतिबंध

गणेशनगर येथील त्या युवकाने कोरोनाविरुद्धची लढाई जिंकल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यापूर्वी त्याचे व त्याच्या परिवारातील सदस्यांचे वैद्यकीय चमूने समुपदेशन केले.आजपासून त्या युवकाला आणखी चौदा दिवस घरीच अलगीकरणात राहावे लागणार आहे. आरोग्यविषयक काळजी त्याने व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना घ्यावी लागणार आहे. आरोग्यविषयक काही तक्रारी असल्यास  तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याबाबत अवगत करावे लागणार आहे. दररोज आपल्या प्रकृतीची माहिती त्याने स्वतः वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. दिवसातून अनेकदा हात पाण्याने स्वच्छ धुवावे लागणार आहे.त्या युवकाच्या कुटुंबाला  तो राहत असलेले घर व परिसर स्वच्छ ठेवावा लागणार आहे. घरातील व्यक्तींनी सुद्धा वारंवार पाण्याने हात स्वच्छ धुवावे अशा सूचना समुपदेशनातून त्यांना करण्यात आल्या आहे.डॉक्टरांची एक चमू त्याच्या घरी भेट देऊन त्याची नियमित तपासणी करणार आहे.त्या युवकाने नियमित पौष्टिक  आहाराचे सेवन करावे असा सल्ला त्याला  समुपदेशनातून देण्यात आला आहे.

 तो युवक कोरोना बाधित असल्याच्या अहवाल आल्यानंतर तो राहत असलेल्या गणेशनगरचा परिसर यापूर्वीच येण्याजाण्यास पोलिसांनी प्रतिबंधित केला होता. आज 10 एप्रिल रोजी तो युवक  कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त जरी झाला असला तरी आजपासून म्हणजे 10 एप्रिलपासून पुढील 28 दिवस गणेशनगरचा परिसर नागरिकांना येण्या-जाण्यासाठी प्रतिबंधितच राहणार आहे.पोलीस बंदोबस्त 28 दिवस तेथे कायम राहणार आहे. या भागातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours