नाशिक, 12 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाने रुग्ण झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. खबरदारी म्हणून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, असं असतानाही नगरसेवक आणि सिडकोचे सभापती दीपक दातीर हे आपल्या 10 ते 15 कार्यकर्त्यांसह क्रिकेट खेळत होते.
नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून प्रशासनाकडून आवाहन केलं जात आहे. परंतु, तरीही संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवून लोकप्रतिनिधी असलेले नगरसेवक दीपक दातीर क्रिकेट खेळताना आढळले.
या परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने धाडस करून दातीर यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दातीर यांच्यावर संचारबंदी उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दातीर यांच्यासह 10 ते 15 कार्यकर्त्यांवर अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
या तरुणीने मैदानात जाऊन दातीर यांना संचारबंदी लागू असताना क्रिकेट का खेळतात असा सवाल विचारला. ही तरुणी फेसबुक लाईव्ह करतेय असं सांगितल्यावर दातीर यांची चांगलीच भंबेरी उडाली. या तरुणीने विचारलेल्या प्रश्नांची दातीर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
Post A Comment:
0 comments so far,add yours