मुंबई, 13 मे : देशासह राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अहोरात्र सेवा आणि आपलं कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेवा आणि पोलीस दलालाही कोरोनाचा धोका भेडसावत आहे. कोरोनामुळे मुंबईत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुरलीधर शंकर वाघमारे यांचा मृत्यू झाला आहे. ते शिवडी पोलीस स्टेशन इथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. या व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी याची माहिती ट्वीट करून दिली आहे. दिवसेंदिवस पोलीस दलातही कोरोनाचा धोका वाढत असल्यानं त्यांचे कुटुंबीय धास्तावले आहेत.
महाराष्ट्रात 1 हजार 7 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. धक्कादायक बाबा म्हणजे यामध्ये सर्वाधिक 400 पोलीस हे मुंबईतील असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 8 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर, नाशिक आणि पुणे येथे प्रत्येकी एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत रुग्णसंख्या वाढत आहे. धारावी हा मुंबईतला हॉटस्पॉट ठरला आहे. आज धारावीत नवे बाधित-46 रुग्ण सापडले. आता धारावीतल्या रुग्णांची संख्या 962 झाली आहे. आज तिथल्या एका रहिवाशाचा मृत्यूही झाला. एकूण 31 मृत्यू या वस्तीत झाले आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours