मुंबई, 13 मे : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. राज्याच्या राजधानी मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. परंतु, मुंबईत रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. एका 93 वर्षांच्या वृद्ध महिलेनं कोरोनावर मात केल्याची घटना समोर आली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत सर्वाधिक वयोवृद्ध महिलेनं कोरोनावर मात केल्याचं पाहून डॉक्टरांनीही समाधान व्यक्त केलं आहे. या वृद्ध महिलेवर सैफिया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. कोरोनाची लक्षण आढळल्यामुळे या महिलेला 17 एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. 10 दिवसांच्या उपचारानंतर या वृद्ध महिलेच्या प्रकृतीत सुधारणार झाली. पूर्ण बरी झाल्यानंतर या महिलेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हॉस्पिटलचे डॉ. दिपेश अग्रवाल म्हणाले की, 'कोरोनाविरोधात लढा देण्यात या महिलेनं वयाला कुठलेही बंधन नसते हे दाखवून दिले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी या महिलेनं कोरोनावर मात केली आहे. हे आमच्यासाठी आणि इतर रुग्णांसाठी शिकण्यासारखं आहे. याआधीही एका 80 वर्षाच्या वृद्ध महिलेनं कोरोनावर मात केली होती. रुग्णांची योग्य प्रकारे देखभाल केली तर कोरोनावर मात करता येऊ शकते.' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबई महापालिकेकडून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे व्हिडिओ प्रसिद्ध केले जात आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आढळलेली रुग्ण बरी झाल्याचंही समोर आलं आहे. नायर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. या रुग्णाने घरी जाताना सोशल डिस्टसिंग पाळणार अशी ग्वाही देत डॉक्टर आणि पालिका प्रशासनाचे आभार मानले आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours