मुंबई, 26 मे : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या आढळून आली आहे. पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या 24 तासात पुण्यात आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा समोर आला आहे.
पुणे जिल्ह्यात 25 मे रोजी एका दिवसात 459  कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी एकट्या पुणे शहरात 399 नव्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे.  ही आजवरची सर्वाधिक एकदिवसीय वाढ आहे.
एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे आतापर्यंत निम्मे रुग्ण ठणठणीत बरेही झाले आहेत. तसंच अॅक्टिव्ह रुग्णांच्या प्रमाणातही घट होत आहे. हे प्रमाण आता  65 वरून 41 टक्क्यांवर आलं आहे.
पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 90 टक्के मृत्यू हे वयोवृद्ध,व्याधीग्रस्त रुग्ण आहेत. त्यामुळं मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, किडनी आदी विकारांनी ग्रस्त रुग्णांनी काळजी घ्यावी, असं विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं आहे.
 नायडू हॉस्पिटलमध्ये मद्यपी कोरोनाबाधित रुग्णाचा राडा
दरम्यान, पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका पॉझिटिव्ह रुग्णाने हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. एवढंच नाहीतर  या रुग्णाने थेट पळून जाण्याचा प्रयत्न केला.  यावेळी डॉक्टर, कर्मचारी वारंवार सांगूनही संबंधित रुग्ण ऐकण्यास तयार नव्हता.
हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावर असलेला रुग्ण थेट मुख्य गेटजवळ  आल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. तरीही न ऐकता या व्यक्तीने थेट गेटच्या वर चढून बाहेर पडला. आणि रस्त्याने चालत निघाला, मात्र नंतर पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर रुग्णाला पकडण्यात आले.
हा रुग्ण मद्यपी असल्याचं सांगितलं जात असून अल्कोहोल विड्रॉलच्या नैराश्येतून याच रुग्णाने खिडकीच्या काचा फोडून तिथल्या डॉक्टरांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती नायडू हॉस्पिटलमधील एका वरिष्ठ परिचारिकेनं न्यूज 18 लोकमतला दिली.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52667 वर
दरम्यान, राज्यात सोमवारी दिवसभरात 2426 नवे रुग्ण सापडले. तर 60 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 52667 एवढी झाली आहे. त्यात ॲक्टिव्ह केसेस 35178 एवढ्या आहेत. तर आज 1186  जणांचा डिस्चार्ज मिळाला. मुंबईत 24 तासांमध्ये 1430 रुग्ण वाढले आहेत. दरम्यान, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारने सुविधांची मोठ्या संख्येने निर्मिती सुरू केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours