मुंबई 5 जून: स्थलांतरीत मजुरांसाठी केलेल्या कामाने अभिनेता सोनू सूद सध्या देशभर ओळखला जातोय. त्याने हजारो कामगारांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मोठी मदत केलीय. गेले काही दिवस सोनू आणि त्यांची टीम यासाठी प्रचंड मेहेनत घेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे सोनू सूदच्या कामाने भारावून गेलेत. गुरुवारी त्यांनी सोनूची त्याच्या निवास्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
रोहित पवार यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'घर जाना हैं', हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरुप पोचवणाऱ्या सोनू सूद यांची आज त्यांच्या घरी भेट घेतली अशी माहिती त्यांनी दिली आहे.
तर काही नेटकऱ्यांनी यावर रोहित पवारांना ट्रोलही करण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्याच पक्षांचे कार्यकर्ते सोनू सूदवर भाजपचा एजंट असल्याचा आरोप करत आहेत. असं असताना तुम्ही का भेट घेतली असा सवाल त्यांनी केलाय.
तर काहींनी तुम्ही असं काही काम करा की सोनू तुमच्या भेटीला आला पाहिजे असंही म्हटलं आहे.
लॉकडाऊनमध्ये मदत केल्यानंतर आता सोनू सूद याने निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबाला मदत करण्यास सुरुवात केली आहे. सोनू सूद आणि त्याच्या टीमने किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या 28000 लोकांना निवासाची जागा आणि खाण्या-पिण्याचे पदार्थ पुरविले आहेत.
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवासी मजुरांना घरी परतण्यासाठी अभिनेता व्यवस्था करीत आहेत. तो म्हणाले की, चक्रीवादळाने ग्रस्त नागरिकांना महानगरपालिकेच्या शाळा व महाविद्यालयांमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जेवणाची आणि विश्रांतीची व्यवस्थाही सोनू सूदच्या टीमकडून केली जात आहे.
सूद याने एका निवेदनात म्हटले आहे की, “आज आपण सर्वजण कठीण परिस्थितीचा सामना करीत आहोत आणि त्या सर्वांचा सामना करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे एकमेकांना साथ देणे. मी आणि माझ्या टीमने मुंबईच्या किनारपट्टी भागात राहणाऱ्या 28000 हून अधिक लोकांना भोजन वाटप केले आणि त्यांची विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये राहण्याची व्यवस्था केली. आम्ही खात्री करुन घेत आहोत की ते सर्वजण सुरक्षित आहे. ''
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours