धान उत्पादक शेतकरी मेळावा व शिवार फेरी कार्यक्रम

विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. 

भंडारा, दि. ९ ऑक्टोबर:- डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला निर्मित धानाच्या विविध कीड व रोग प्रतिकारक वाणाचा वापर शेतकऱ्यांनी करावे. जेणेकरून कीड-रोगांचा कमीत कमी प्रादुर्भाव होऊन जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येईल. धानाच्या विविध वाणांची माहिती, धानाची पेरणी गादीवाफ्यावर करावी जेणेकरून पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करता येईल. बदलत्या हवामानाचा विचार करता कमी कालावधीच्या वाणांचा वापर करावा. पारंपारिक शेतीच्या जोडीला फळ, भाजीपाला पिकांची लागवड करून आपला आर्थिक स्तर उंचवावा. पेरीव धान लागवड ही फायदेशीर असून शेतकऱ्यांनी फोकीव पद्धतीने धान लागवड करू नये. येणाऱ्या रबी हंगामात कमी खर्चाचे तंत्रज्ञान, शून्य मशागत तंत्रज्ञान अवलंब करून उन्हाळी धानाला पर्यायी पिकांचा वापर करावे असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्र, साकोलीच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा डोंगरवार यांनी केले. 

त्या कृषि विज्ञान केंद्र, साकोली व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “धान उत्पादक शेतकरी मेळावा व शिवार फेरी” कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून साकोली कृषी अधिकारी वृषाली देशमुख, कृषी अधिकारी, साकोली, छाया कापगते, साकोली कृषि विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा आर. डोंगरवार, महिंद्रा कृषी केंद्राचे कमलेश बावनकुळे, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक अश्विन बन्सोड, तालुका अभियान व्यवस्थापक सविता तिडके, साकोली कृषि विज्ञान  केंद्राचे कृषी विस्तार विषय विशेषज्ञ पी. पी. पर्वते, वाय. आर. महल्ले, कृषि विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्र विषय विशेषज्ञ डॉ. एन. एस. वझिरे, पशुसंवर्धन विषय विशेषज्ञ डॉ. पी. बी. खिरारी, हवामानशास्त्र विषय विशेतज्ञ लयंत अनित्य उपस्थित होते.  

 कृषि विज्ञान केंद्र, साकोली व कृषि संशोधन केंद्र, साकोली, प्रक्षेत्रावर विस्तार शिक्षण संचालनालय डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विदयापीठ अकोलाच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. त्यावेळी शिवार फेरी करण्यात आली. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला निर्मित विविध धानाच्या कीड व रोग प्रतिकारक वाणांची लागवड पाहणी, धान पिकाचे विविध जाती, वाण माहिती, प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष शेतात उभा मशीनने पेरलेला आवत्या धान, विविध औजारे, आवत्या पेरणी मशीन, धानातील पेट्रोलवर चालणारे डवरण यंत्र, धान कापणी यंत्र, विविध तंत्रज्ञान, जनावरांचा पोषक चारा, शेळीच्या जाती, धान पिक लागवडीच्या विविध पद्धती याविषयी शेतकऱ्यांनी पाहणी करून माहिती घेतली. 

त्यानंतर कृषि विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्र विषय विशेषज्ञ डॉ. एन. एस. वझिरे यांनी धान पिकावरील प्रमुख किड व रोगांचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले, रब्बी पिकातील बीज प्रक्रियेचे महत्व याविषयी माहिती दिली. कृषि विज्ञान केंद्राचे कृषी विस्तार विषय विशेषज्ञ, पी. पी. पर्वते यांनी कृषि क्षेत्रात विविध मोबाईल अँप्सचा वापर याबाबत माहिती देऊन कृषि विज्ञान केंद्र, साकोली अंतर्गत असलेल्या सुविधांची माहिती दिली. कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ वाय. आर. महल्ले पेरीव धान लागवड पद्धत बाबत सविस्तर माहिती दिली तसेच रबी पिकाकरीता विविध औजारे व यंत्रे बाबत मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन विषय विशेषज्ञ डॉ. पी. बी. खिरारी यांनी रबी चारा पिक लागवड तंत्रज्ञान बाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. हवामानशास्त्र विषय विशेतज्ञ लयंत अनित्य यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जिल्हा कृषी हवामान संदेश- गरज व फायदे  या विषयावर मार्गदर्शन केले. कमलेश बावनकुळे यांनी महिंद्रा कृषी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देऊन विविध औजारे बाबत माहिती दिली. कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला निर्मित विविध प्रकाशने, कृषि संवादिनी, टायकोडर्मा, मेटारायझीयम, बायोमिक्स विक्री करिता उपलब्ध करून देण्यात आलेले होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि विस्तार विषय विशेषज्ञ प्रमोद पर्वते यांनी केले तर उपस्थितांचे आभार कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ वाय. आर. महल्ले यांनी मानले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कार्यक्रम सहायक संगणक कपिल गायकवाड, गणेश गुसिंगे, मुकेश सुखदेवे, आशा इडोळे, प्रियंका जांभोळे, गीता बोरकर तसेच उपस्थित शेतक-यांनी सहकार्य केले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours