उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत दुर्गम भागात सावळेश्वर हे गाव आहे. येथील माधव शंकर रावते या ७१ वर्षीय शेतकऱ्याने शनिवारी आपल्या शेतातील पऱ्हाटीची चिता पेटवून त्यात स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. मात्र, गाव दुर्गम भागात असल्याने दोन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना सोमवारी उघडकीस येताच शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली. माधव रावते यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. पत्नी अनुसया, मुलगा गंगाधर व तीन विवाहित मुली असलेल्या माधव रावते यांनी आपल्या कुटुंबाचा भार शेतीच्या आधारावरच पेलला. मात्र, सततच्या नापिकीमुळे ते निराश होते. यावर्षी बोंडअळीमुळे केवळ तीन क्विंटल कापूस हाती आला होता. त्यामुळे ते आर्थिक संकटात होते. त्यांच्यावर स्टेट बँकेचे ६० हजारांचे कर्ज असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चिंतेत भरच पडली होती. शनिवारी ते शेतात गेले होते कापूस वाचल्याने पऱ्हाटीचे ढीग शेतात लावून ठेवले होते. शनिवारी त्याच पऱ्हाटीची चिता पेटवून त्यांनी स्वतःला त्यात झोकून दिले. त्यांच्या शेतातून पऱ्हाटीचा ढीग पेटत असल्याचे दिसताच गावकऱ्यांनी त्यांचा मुलगा गंगाधर याला त्याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच गंगाधर व गावकरी शेतात धावत गेले. तोपर्यंत पऱ्हाटीच्या ढिगासह माधव रावते हेही त्यात संपूर्णपणे जळल्याचे आढळून आले.

या हादरवून सोडणाऱ्या घटनेबाबत माहिती मिळताच शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार, साहेबराव पवार, संभाजी ब्रिगेडचे डॉ. अजित नलावडे यांनी सावळेश्वर येथे जाऊन रावते कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दरम्यान, ‘डोक्यावर असलेले कर्ज आणि त्यातच गेल्या काही वर्षांपासून होत असलेली नापिकी, यामुळे माझे वडील गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. याचदरम्यान शनिवारी ते शेतात गेले असता शेतातच त्यांनी पऱ्हाटी पेटवून त्यात स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली’, असा आक्रोश मृत शेतकरी माधव रावते यांचा मुलगा गंगाधर करत होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours