नागपूर - प्रफुल्ल पटेल यांच्याशी कोणतेही मतभेद नसून भंडारा-गोंदिया भाजपमुक्त करणे हेच आमचे ध्येय असल्याचे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. तसेच प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल जर काँग्रेसच्या तिकीटावर ही पोटनिवडणूक लढवणार असतील, तर काँग्रेसचा नेता म्हणून मी त्यांचा प्रचार करेल, असेही ते म्हणाले.

नरेंद्र मोदी यांचे धोरण देशहिताचे नाही. केंद्र तसेच राज्यातील भाजप सरकारने संवैधानिक व्यवस्थेलाच धक्का लावला आहे. ती संपवण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी, उद्योजक, बेरोजगारांना देशोधडीला लावण्याचे काम केले. नोटाबंदीचा घेतलेला निर्णयही योग्य नसल्याचे सांगत त्यांनी मोंदींशी चर्चा केली, मात्र त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला, असे पटोले म्हणाले. 

प्रफुल्ल पटेल यांच्याशी आता कोणतेही मतभेद नाहीत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी हा भेद न करता एकत्रित निवडणूक लढून ती आम्हीच जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेस ही जागा लढणार की राष्ट्रवादीला देणार? हा मोठा प्रश्न आहे. येत्या दोन दिवसात काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते संयुक्तपणे उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहे, अशी माहिती पटोले यांनी दिली. गोंदिया–भंडारा मतदार संघातील राजकारणामुळे नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांचे आतापर्यंत टोकाचे मतभेद होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत पटोले यांनीच पटेल यांचा दारूण पराभव केला होता. आता दोन्ही नेते भाजपच्या विरोधात एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, भंडारा- गोंदियाच्या लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेसकडून नाना पटोले लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours