मुंबई, 19 जून : शिवसेनेचा आज 52वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे शिबीर होणार आहे. या शिबिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत.
गोरेगाव येथे पार पडणाऱ्या शिबिराचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यात सकाळी 11 वाजेपासून  सायंकाळी 5 पर्यंत विविध विषयांवर चर्चासत्रे होतील. दरम्यान यामध्ये पक्षुप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिल.
दरम्यान, आजच्या या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे भाजप युती बद्दल काही बोलणार का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर आजच्या या 52 व्या वर्धापन दिनी सामना आग्रलेखातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.
'धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरातच उठले आहेत. मोदी हे सतत परदेशात असल्याने त्यांच्या डोळय़ात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे. शिवसेनेचा मार्ग सरळसोट कधीच नव्हता. आजही नाही.' असं सामनाच्या आग्रलेखातून लिहण्यात आलं आहे.
तर 'शिवसेनेच्या मार्गात अडचणीचे डोंगर आहेतच. ते आपण ओलांडले की त्या डोंगराच्याच दगडांपासून आपल्या कार्याची स्मारके निर्माण होतील. महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईलच येईल व दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद राष्ट्रीय पातळीवर शिवसेना निर्माण करील. तेवढा आत्मविश्वास आमच्यात नक्कीच आहे.' असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे.
त्यामुळे आता आजच्या भाषणावेळी उद्धव ठाकरे कोणत्या मुद्द्यांवर बोलतील हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours