मुंबई: येत्या मंगळवारी अंगारकी चतुर्थी निमित्त श्रीसिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नय म्हणून श्रीसिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाने जोरदाय तयारी सुरू केली आहे. अंगारकीला महिला आणि पुरूष भाविकांसाठी वेगळी रांग असणार आहे. शिवाय अपंग आणि गरोदर महिलांसाठीही वेगळ्या रांगेची सोय करण्यात येणार आहे. दत्ता राऊळ मार्गाकडून महिलांची रांग असेल तर रविंद्र नाट्य मंदिराच्या बाजूने पुरुषांची रांग असेल. मंदिरातील अधिकारी व कर्मचारी यांना ओळखपत्र दाखवून रिद्धी प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येईल. मंदिर परिसरात भाविकांसाठी वैद्यकीय पथक तैनात करण्यात येणार असून अॅम्ब्युलन्सचीही सुविधा करण्यात येणार आहे. पिण्याचे पाणी, चहा, मोबाईल टॉयलेट यांसारख्या व्यवस्थाही मंडपात करण्यात येणार आहेत. तसेच मोफत बससेवाही उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
उद्या ३० जुलै मध्यरात्री दीड वाजल्यापासून ते पहाटे सव्वातीनपर्यंत आणि मंगळवारी पहाटे ३ वाजून ५० मिनिटांपासून ते १२ वाजेपर्यंत भाविकांना श्रींचे दर्शन घेता येणार आहे. न्यासातर्फे सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ३० जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ३१ जुलै मध्यरात्री १२ वाजेपर्यंत दादर रेल्वे स्थानक ते रवींद्र नाट्यमंदिर आणि प्रभादेवी रेल्वे स्थानक ते रवींद्र नाट्य मंदिर या दरम्यान मोफत बससेवा देण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार असल्यामुळे भाविकांनी मौल्यवान वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत न आणण्याचे आवाहन न्यासातर्फे करण्यात आले आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours