रिपोर्टर-हर्षीता ठवकर
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाने जलक्रांती घडविली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचे नियोजन, व्यवस्थापन व ताळेबंद निर्माण करण्यात या अभियानाने महत्वाची भूमिका बजावली आहे. २२३ कामांपैकी २०० कामे पूर्ण झाली असून १२ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे मोहाडी तालुक्यात जलक्रांती झाल्याचे दिसत आहे.
या साठलेल्या पाण्याचा उपयोग शेती सिंचनासाठी होवून मोठ्या प्रकल्पांची गरज आता संपल्यात जमा होतांना दिसत आहे. २०१७-१८ या वर्षात मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ६ विभागांमार्फत २२३ कामे प्रस्तावितकरण्यात आली. मोहाडी तालुक्यासाठी जलयुक्त शिवार सुक्ष्म व लघुसिंचनाचे जाळे निर्माण करण्यात मोलाचे ठरले आहे. २०१५ पासून या अभियानांतर्गत झालेल्या कामांमुळे कायमस्वरुपी जलसाठे निर्माण झाले. दुर्लक्षित साठ्यांचे पुनर्निर्माण व मजबुतीकरण करण्यात आले.
२०१७-१८ या वर्षात कृषी विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग, वनविभाग, जलसंधारण व भूजल सर्व्हेक्षण विभागामार्फत प्रस्तावित २२३ कामांसाठी राज्य शासनाचे वतीने ५४०.४७ लाखाच्या निधीला मंजुरी दिली. आता पर्यंत या कामांसाठी ११९.८४ लाखांची देयके कंत्राटदारांना देण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात कामे पुर्ण झाल्याने शेतकऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे.
कृषी विभागाची कामगिरी
२०१७-१८ मध्ये कृषी विभागामार्फत ७४ कामांसाठी १३१.४० लाखांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. यापैकी ७१ कामे पूर्ण झाली तर २ कामे प्रगतीपथावर आहेत. १ कामाची माहिती नाही. झालेल्या कामासाठी आतापर्यंत ५.८० लाखांची देयके देण्यात आली. या कामांमध्ये सिमेंट नाला बांध ३ कामे, सिमेंट बंधारा दुरुस्ती १७, वळण बंधारा दुरुस्ती १, नाला खोलीकरण ३५, मजगी १, मजगी पुनर्जीवन १, बोडी नूतनीकरण ५, शेततळे ३ अशा ७४ कामांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग
जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या १६ कामांसाठी २६०.२० लाखाच्या निधीला मान्यता देण्यात आली. त्यापैकी १२ कामे पूर्ण झाली तर ४ कामे प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत ६१.१५ लाखाचा निधी कंत्राटदारांना देण्यात आला. या कामांमध्ये सिमेंट नाला बांध ४, सिमेंट प्लग बंधारा दुरुस्ती २, केटीवेअर दुरुस्त २, लघु तलाव दुरुस्ती ३, मामा तलाव दुरुस्ती ५ कामांचा समावेश आहे.
भूजल सर्वेक्षण विभागातर्फे रिचार्ज शाप
पंचायत समितीला मजगी पुनर्जीवनाच्या ५८ कामांसाठी २०.३३ लाखाच्या निधीला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ५७ कामे पूर्ण झाली असून त्यावर १४.७ लाखाचा निधी खर्च करण्यात आला. १ कामाची माहिती नाही. भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने रिचार्ज शापच्या १५ कामांसाठी १२.४५ लाखाच्या निधीला मंजुरी देण्यात आली. सर्व कामे पूर्ण झाली असून ११.९४ लाखाचा निधी खर्च करण्यात आला.
वनविभाग व जलसंधारण विभाग
वनविभागामार्फत एकुण ५८ कामांसाठी ६६.१५७ लाखाच्या निधीला मंजुरी देण्यात आली. यापैकी ४९ कामे प्रत्यक्ष सुरु करण्यात आली असून ४४ कामे पूर्ण झाली. या कामांवर ५.७५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला ९ कामांची माहिती नाही. झालेल्या कामांमध्ये डी.प.सी.सी.टी. ४० कामे, पाणी साठवण तलाव ११, नाला सरळीकरण व खोलीकरण ५, सिमेंट बंधारे २ यांचा समावेश आहे. जलसंधारण विभागामार्फत २ कामांसाठी ४९.९३ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला.
Post A Comment:
0 comments so far,add yours