कृषी महाविद्यालय वाचविण्यात पालकमंत्री, आमदारांची फौज कुचकामी
शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचा आरोप.

यवतमाळ: कृषी महाविद्यालयासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याऐवजी स्वत:चे जन्मगाव महत्वाचे वाटले. यावरूनच मुख्यमंत्री व भाजपाचे शेतकरी प्रेम किती बेगडी आहे हे सिद्ध होते, त्यांचा हा निर्णय निषेधार्ह आहे अशी टिका शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी केली.
यवतमाळ जिल्ह्याने भाजपाच्या झोळीत भरभरून मते टाकली. केंद्रीय मंत्री, पालकमंत्री व एकृण पाच आमदार जिल्ह्यात असूनही यवतमाळ साठी प्रस्तावित असलेले कृषी महाविद्यालय चंद्रपुर जिल्ह्यातील मुल तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या जन्मगावी पळविण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले. जिल्ह्याशी संबंध नसलेल्या अन्न प्रक्रीया महाविद्यालयावर जिल्ह्याची बोळवण करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात कृषी महाविद्यालय मंजूर करून आणल्याचा गाजावाजा व श्रेय घेण्याची धडपड करणा-या पालकमंत्री ना.मदन येरावार यांची भाजप सरकारमध्ये किती पत आहे हे या निमित्ताने सिद्ध झाले. महसूल राज्यमंत्री म्हणुन ना.संजय राठोड हे देखील या अपयशात वाटेकरी आहेत असाही आरोप पवार यांनी केला.

एकेकाळी पांढ-या सोन्याचा जिल्हा म्हणुन लौकीक असलेल्या यवतमाळला शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा असा कलंक गेल्या काही वर्षात लागला. या जिल्ह्यातील दोन भूमिपुत्र मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणली. माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक साहेबांनी हरितक्रांती करून राज्यातील शेतीला नवसंजिवनी दिली. तर स्व.सुधाकरराव नाईक साहेबांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात संपुर्ण राज्यात जलक्रांती आणली. मात्र या दोन महान विभुतींचा जिल्हा आज शेतकरी आत्महत्यांचा कलंक घेऊन जगभरात कुप्रसिद्ध झाला आहे.

हा कलंक पुसण्यासाठी शासकीय कृषी महाविद्यालयाच्या रूपाने एक माध्यम उपलब्ध झालं असतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी कृषी महाविद्यालय औद्योगिकरण असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यात स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यवतमाळ हे विदर्भाचं केंद्रस्थान आहे, मात्र चंद्रपुर जिल्ह्यातील मुल हे ठिकाण दुर्गम भागात आहे, ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीचे आहे. मुख्यमंत्र्यांनी गणेश चतुर्थीला शेतकरी सुखी व्हावा म्हणुन गणरायाच्या चरणी प्रार्थना केली. मात्र कृषी महाविद्यालयाच्या रूपाने आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला एक आशेचा किरण दिसत असतांना मुख्यमंत्र्यांना जन्मगाव आठवले, हा अत्यंत चुकीचा निर्णय असल्याने शासनाने याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी देवानंद पवार यांनी केली.

यवतमाळ जिल्ह्यात काही खाजगी कृषी महाविद्यालये आहेत. मात्र तेथिल फि तब्बल ८.५ लाख रूपये आहे. ती शेतक-यांच्या पाल्यांना परवडणारी नाही. त्यामुळे शासनाने यवतमाळ येथे यशदाच्या धर्तीवर देशातील प्रमुख कृषी प्रशिक्षण केंद्र सुरू करावे जेणेकरून येथिल शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञान, किटकनाशके, हवामान व शेतीविषयक इतर माहिती मिळू शकेल. आजवर अनेक मंत्री, अधिका-यांनी विदेशात शेती प्रशिक्षण दौरे काढून केवळ जनतेच्या पैशावर मौज करून घेतली. मात्र त्याचा स्थानिक शेतक-यांना काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा दुर्दैवी कलंक पुसण्यासाठी कृषी महाविद्यालयासह यशदा सारखे प्रशिक्षण केंद्र यवतमाळ जिल्ह्यात सुरू करावे अशी मागणीही देवानंद पवार यांनी केली आहे. अन्यथा शेतकरी न्यायहक्क आंदोलन समिती आंदोलनाचा पवित्रा घेईल असा ईशाराही त्यांनी दिला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours