नागपूर- विवाह सोहळा म्हणजे वारेमाप पैसा, मानपान, बॅण्डबाजा, वरातीवर होणारा लाखो रुपयांचा अनाठायी खर्च, त्यात भेटस्वरूपातील महागड्या वस्तू. पैशांची अशी उधळण असलेले अनेक विवाह समारंभ आपण बघितले असतील. पण याला बाजुला सारत नागपुरच्या संवेदनशील मनाच्या खुशाल राऊत आणि प्रियंका शेंडे या वर-वधुनं कुठल्याही धर्माचा आधार न घेता संविधानाच्या साक्षीनं ग्रहस्थाश्रमात प्रवेश करीत समाजासमोर नवा पायंडा पाडला. या लग्नात मंगलाष्टकाऐवजी संविधानाचं वाचन करण्यात आलं. तसंच आलेल्या पाहुण्यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली.
राज्याच्या आदिवासी विकास विभागात कार्यरत असणाऱ्या खुशाल राऊत आणि मेडिकल हाँस्पीटल मध्ये परिचारिका असणाऱ्या प्रियांका शेंडे यांचा हा विवाह. कुठलेही वाद्य नाही, हार तुरे नाही आणि अहेर तर दुरच. या दोघांचाही विवाह सोहळा लग्नातील सर्व प्रथा परंपरांना फाटा देत मंगलाष्टकांएवजी संविधानाचं वाचन करून झाला.
हलाखीच्या परिस्थीतून पुढे आल्यानंतर मला सरकारी नोकरी लागलीय. समाजातील आणि गावातील बेरोजगार आणि उरात स्वप्न घेऊन जगणाऱ्या तरुणांसांठी मला अभ्यासिका सुरु करायाची असून, त्यासाठीच लग्नाचा खर्च वाचविला असल्याची प्रतिक्रिया खुशाल राऊतने न्यूज18 लोकमतला दिली.
वधु वरांनी कुठल्याही भेटवस्तू न स्विकारता लग्नाला आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना संविधानाची प्रत भेट दिली. खुशालने ज्येव्हा प्रियांकाला लग्न पद्धतीची कल्पना दिली त्यावेळी प्रियांकाने लगेच त्यास होकार दिला. खुशालच्या सामाजिक कार्योत मी सदैव त्यांच्या सोबत राहिन अशी प्रतिक्रिया प्रियांकाने न्यूज18 लोकमतला दिली.
या अनोख्या पद्धतीने केलेल्या लग्नामुळे या दाम्पत्याने दोन ते अडीच लाख रुपये वाचविले आणि यातुनच स्वत: वाचनालय सुरु केलं. आपल्याप्रमाणं इतर तरुणांना स्वत:चं अस्तित्व सिद्ध करून दाखविण्याची समान संधी मिळावी, या भावनेतून त्यांनी लग्न मंडपातच सुशिक्षीत बेरोजगारांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं. यात मार्गदर्शन करण्यासाठी आयपीएस अधिकारी संदिप तामगाडगे आणि एर आयएएस अधिकारी आले होते अशी माहिती खुशालचे मामा प्रमोद गणवीर यांनी दिली.
स्पर्धा परिक्षेच्या व्याख्यानाचा तरुणांनी लाभ घ्यावा, यासाठी त्यांनी शहरातील अनेक वाचनालयांत लग्नपत्रिकेचं वाटप केलं होतं. त्यामुळं लग्नाला मोठ्या संख्येनं तरुण मंडळी उपस्थिती होती. कुठलीही भेट न स्वितकारता या लग्नात येणाऱ्या प्रत्येक वर्हाड्याला संविधानाच्या पुस्तिकेचे वाटप यावेळी करण्यात आल्यामुळे या एका लग्नाची सध्या विदर्भात सर्वत्र चर्चा आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours