यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगावच्या जंगलात माणूस आणि वाघाचा संघर्ष सुरु आहे. नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश मिळताच शार्प शुटर राळेगावच्या जंगलात दाखल झाले आहेत. एका बाजूला वाघीण इतरांसाठी मृत्यू बनून फिरतीय, तर दुसऱ्या बाजूला ती स्वतः बंदुकीच्या निशाण्यावर आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने ग्रिन सिग्नल दिल्यामुळे, माणूस आणि निसर्गाच्या या संघर्षात वाघिणीचा मृत्यू अटळ आहे.
राळेगावच्या जंगलातील ज्या वाघीणीनं तेरा जणांचा जीव घेतला, त्या नरभक्षक टी-1 वाघिणीचा माग काढत मृत्यू पुढे सरसावतोय. यवतमाळच्या राळेगावातल्या जंगलातील नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचं फर्मान निघाल्यानंतर वन विभागाचे शार्प शूटर तिच्या शोधात जंगल पिंजून काढताहेत. वाघीणीची दहशत एवढी आहे की, परिसरातील गावकऱ्यांनी स्वतःला घरात कैद करून घेतल्याचं चित्र आहे.
याआधी वन विभागानं नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, ती हाती लागली नाही. तिच्यावर विष प्रयोगही करण्यात आला पण तोही व्यर्थ गेला. अखेरीस तिला ठार मारण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिलेत. आणि त्यांच्या या आदेशाला हायकोर्टानंही हिरवा कंदील दिलाय.
वाघीणीला मारण्याच्या आदेशानं वन्यजीव प्रेमी मात्र नाराज झाले आहेत. वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करावं अशी त्यांची मागणी आहे. राळेगावच्या जंगलात एका बाजूला वाघीण मृत्यू बनून फिरतीय, तर दुसऱ्या बाजूला या बंदुकांच्या निशाण्यावर वाघीण आहे. माणूस आणि निसर्गाच्या या संघर्षात वाघिणीचा मृत्यू अटळ आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours