नवी दिल्ली: महात्मा गांधी यांच्याबद्दल जगभरातल्या लोकांना प्रचंड कुतूहल असतं. दिल्लीतल्या ज्या बिर्ला हाऊसमध्ये गांधींजींनी शेवटचे 144 दिवस व्यतीत केले त्या स्थळाचं आता स्मारकात रूपांतर झालं असून हे स्मारक जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. या स्मारकातल्या एका खोलीत महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पेटल यांना भेटले होते. ती त्यांची शेवटची भेट ठरली. त्या भेटीनंतर गांधीजी दररोजच्या प्रार्थना सभेसाठी दहा मिनिटं उशीरा गेले आणि पुन्हा कधीच परत आले नाही. जो कुणी या खोलीला भेट देतो त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्याशिवाय राहात नाहीत.

दिल्लीतल्या 30 जानेवारी मार्गावर गांधी स्मृती स्मारक आहे. महात्माजींनी आपल्या आयुष्याच्या शेवटी चार महिन्यांपेक्षा जास्त काळ याच ठिकाणी घालवला होता. पूर्वीचं बिर्ला हाऊस म्हणून प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आता गांधी स्मृती स्मारक म्हणून ओळखलं जातं. फाळणीनंतर देशभर दंगे उसळले होते.

ते शांत व्हावेत यासाठी गांधीजी अनेकांशी चर्चा करत. रोजच्या प्रार्थनासभाही याच ठिकाणी होत होत्या. 30 जानेवारीच्या प्रार्थनासभेसाठी जाताना नथूराम गोडसे याने याच ठिकाणी गांधींजींची गोळी मारून हत्या केली. गांधीजी शेवटी ज्या मार्गानं गेले तो मार्ग आणि ते ठिकाण जतन करून ठेवण्यात आलंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours