नागपूर: एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार महात्मा गांधीची 150 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची तयारी करतंय. पण गांधींचे विचार आजच्या तरूणांपर्यंत कसे पोहोचणार  हा प्रश्न आहे? कारण देशभरात गांधी विचारांच्या अभ्यासासाठी सुरु करण्यात आलेल्या अध्यासनापैकी 86 टक्के बंद असल्याची धक्कादाय माहिती पुढं आलीय.
महात्मा गांधीच्या विचारांना देशभरात पोहचवण्यासाठी सरकारने देशाच्या विविध विद्यापीठ आणि संस्थांमध्ये 137 महात्मा गांधी अध्यासनं सुरू केलीत. पण यापैकी फक्त 19 केंद्रच सुरु असल्याची माहिती पुढं आलीय. त्यातही वर्ध्याचं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय वगळलं तर अन्यत्र गांधी विचारधारेत संशोधन करणाऱ्यांची संख्या गेल्या दशकात रोडावली आहे.
देशात अनेक केंद्र बंद पडत असताना नागपूरचंही गांधी विचारधारा केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे. खर तर तरुण पिढीला सध्याच्या प्रचलित माध्यमातून म्हणजेच सोशल मिडियातूनही गांधी विचार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मत सर्वोदयी कार्यकर्त्या रश्मी पारसकर यांनी व्यक्त केलंय.
महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती निमित्त आणखी काही अध्यासन केंद्रे सुरु करण्यात यावी अशी विनंती अनेक मंत्रालयांनी पंतप्रधान कार्यालयाला केली होती. मात्र सध्या असलेल्या केंद्रांपैकी 86 टक्के अध्यासनं केंद्र बंद असल्याची धक्कादायक माहिती खुद्द मनुष्यबळ मंत्रालयानेच पीएमओला दिल्याची माहिती पुढे आल्यानं खरं सत्य बाहेर आलं.
महात्मा गांधींच्या नावाने असणाऱ्या अध्यासन केंद्रात गांधी विचार दर्शन व कार्यावर संशोधन आणि प्रसार केला जातो. पण ही अध्यासन केंद्रंच बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने गांधी विचारांचा प्रसार कसा होणार हाच असा प्रश्न गांधीवादी कार्यकर्ते विचारत आहेत. या केंद्रांना सरकार पुरेसा निधी देत नाही आणि त्याचं व्यवस्थापनही नीट होत नाही. त्यामुळं घोषणांचा पाऊस पाडण्यापेक्षा असलेली केंद्र सक्षम करा अशी मागणीही या कार्यकर्त्यांनी केली आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours