यवतमाळ : राळेगाव तालुक्यात 13 शेतमजुरांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी-1 वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या मोहीमोत सामील करण्यात आलेल्या पवन, विजय, शिव आणि हिमालय या चारही हत्तींना मध्यप्रदेशातील कान्हा अभयारण्यात परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
वन विभागाने लावलेल्या बेस कॅम्पमधील बेफाम झालेल्या एका हत्तीने बुधवारी रात्री साखळी तोडली आणि धुमाकूळ घालत १५ किलोमीटर दूर असलेल्या चहांद गावात एका महिलेला ठार केलं आणि एका व्यक्तीला गंभीर जखमी केलं. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वन विभागाने सावरखेड बेसकॅम्प येथिल असलेल्या पवन, विजय, शिव आणि हिमालय या चारही हत्तींना मिशन टी1 कॅपचर मधून माघारी पाठवण्याचा निर्णय घेतलाय. या मोहिमेत पोलीस विभागाचे शूटर, वन विभागाचे शूटर आणि 100 पेक्षा जास्त वन कर्मचारी सहभागी आहेत.
धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीला सद्या पांढरकवडा जवळील उमरी येथे वनविभागाच्या डेपोत हलविण्यात आले आहे. आज पांढरकवडा येथे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा, अप्पर प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपवनसंरक्षक के. अभर्णा यांच्यासह इतर वन अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावून या चारही हत्तींना परत मध्यप्रदेशातील कान्हा अभयारण्यात पाठवण्याचा निर्णय घेतला. याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच वन खात्याच्या प्रधान सचिवांनाही कळविण्यात आले
Post A Comment:
0 comments so far,add yours