नवी दिल्ली: भारताची न्यायव्यवस्था सर्व जगात श्रेष्ठ आहे. न्यायव्यस्थेचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यावर अनेक संकटं आली. ती सर्व संकटं झेलून न्यायव्यवस्था बळकट झालीय. म्हणूनच ती जगात 'सुप्रीम' आहे. हे भावनिक उद्गार आहेत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचे. दीपक मिश्रा सोमवारी (1 ऑक्टोबर) निवृत्त झाले. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने मिश्रा यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभाचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमात त्यांनी सरन्यायाधीश म्हणून आपलं शेटचं भाषण केलं आणि आठवणींना उजाळा दिला. मी काम करताना लोकांचा इतिहास पाहून नाही तर त्यांचं काम पाहूनच त्यांच्याशी व्यवहार केला असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी नियोजित सरन्यायाधीश रंजन गोगोईही उपस्थित होते.
दीपक मिश्रा आपल्या भाषणात म्हणाले,'' सक्षम न्यायापालिकेसाठी न्यायाधीश आणि वकिलांची भूमिका सर्वात महत्वाची असते. तरूण वकिल आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि क्षमता आहे. ही ऊर्जाच भविष्य उज्ज्वल करणार आहे. समाज ही मुलांची दुसरी आईच असते. श्रीमंत असो की गरिब सगळ्यांचे अश्रू सारखेच असतात.''
सरन्यायाधीशांनी कॉलेजियम पद्धतीचही जोरदार समर्थन केलं. या पद्धतीमुळेच न्यायपालिकेचा दबदबा निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी नियोजित सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही मिश्रा यांची प्रशंसा केली. ते म्हणाले, मिश्रा यांनी मॉब लिंचिंग आणि ऑनर किलिंग विरूद्ध अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहेत.
राज्यघटनेने नेमून दिलेल्या कर्तव्यांचं प्रामाणिकपणे पालन करणं हीच राज्यघटनेप्रती खरं समर्पण असेल. आपण जे खातो, पेहेराव करतो, विश्वास ठेवतो त्या गोष्टी आपल्यांमध्ये भेद निर्माण करतात. पण राज्यघटना मात्र सर्वांना एका सूत्रात बांधून ठेवते. गोगोई हे 3 ऑक्टोबरला सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours