मुंबई: यंदाच्या हंगामातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे करण्यात आली. निफाडचा पारा 7.6 अंशाखाली आला होता. नाशिक प्रमाणेच नगरचा पारासुद्धा आज खाली आला होता. नगरमध्ये 9.2 तर नाशिकमध्ये 9.4 अंश किमान तापमानाची नोंद करण्यात आली.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता असल्याने थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय. तर, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.
पुण्याचंही किमान तापमान 9.5 अंशापर्यंत खाली आलं होतं. साताऱ्यानेही आज पुण्याची बरोबरी केलीय. साताऱ्यात देखील 9.5 अंश सेल्सीयस किमान तापमान नोंदविल्या गेलं. तर, औरंगाबाद आणि जळगाव या दोन्ही ठिकाणी 10.4 अंश किमान तापमानाची नोदं करण्यात आली.
मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाल्याने बंगालच्या उपसागरावरून बाष्प खेचले जात आहे. यामुळे विदर्भाच्या पूर्व पट्ट्यातील नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांच्या काही भागांत व महाराष्ट्रातील काही भागांत किंचित ढगाळ हवामान आहे. नागपूर परिसरात हलक्या सरी पडल्या. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व महाराष्ट्रात हवामान कोरडे असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.
Post A Comment:
0 comments so far,add yours