पंढरपूर, 24 डिसेंबर : अयोधास्वारी यशस्वी करून दाखवल्यानंतर आता उद्धव ठाकरे पंढरपूरवारी करणार आहेत. सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख आपल्या कुटुंबासह पंढरपूरमध्ये दाखल होतील. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर ते जाहीर सभा घेणार आहेत.
राम मंदिर आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्यावरून ते भाजविरोधात गजर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे शरयू नदीप्रमाणेच चंद्रभागेची देखील महाआरती करणार आहेत.
राम मंदिर आणि झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन केल्याचं राम कदम म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा दुपारी ४ वाजता तर चंद्रभागा नदीची आरती येथील इस्कॉन मंदिराच्या घाटावरून सायंकाळी ६ वाजता केली जाणार आहे.
पंढरपुरात शिवसेनेची न भुतो न् भविष्यती अशी महासभा होईल असा दावा, कार्यक्रमाची तयारी करणाऱ्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि मंत्र्यांनी केला आहे. दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, रामदास कदमांसह शिवसेनेचे पदाधिकारी पंढरपुरात तळ ठोकून आहेत.
शिवसेनेच्या महासभेसाठी पंढरपूर सज्ज झालं असून मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची पावलं पंढरीच्या दिशेनं वळू लागली आहेत. तर उद्धव ठाकरे आज सभेत काय बोलणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours