मुंबई, 25 जानेवारी : मुंबईतील वडाळामधील आयमॅक्स थिएटरमध्ये ठाकरे चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पार पडला. यासाठी दिग्दर्शक अभिजीत पानसेही उपस्थित होते. पहिल्या शोवेळी ढोलताशाच्या गजरात प्रेक्षकांचं स्वागत करण्यात आलं. 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला ठाकरे हा सिनेमा आज रिलीज झाला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा या सिनेमात बाळासाहेबांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेत्री अमृता राव हिने बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरेंची भूमिका साकारली आहे. 
संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलं आहे. मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. 
सिनेमा आणि नाराजीनाट्य
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारीत 'ठाकरे' चित्रपटाचं मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आलं होतं. परंतु, या स्क्रीनिंगदरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे अभिजीत पानसे कुटुंबासह बाहेर निघून गेले. चित्रपटाचे निर्माते आणि सेनेचे खासदार संजय राऊत त्यांची समजूत काढण्यासाठी चित्रपटागृहाबाहेर आले होते. मात्र, त्यांना न जुमानता पानसे निघून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी पानसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोहाचायला उशीर झाला. तोपर्यंत सिनेमागृह प्रेक्षकांनी भरलं होता. त्यामुळं जागा न मिळाल्याने दुखावलेल्या पानसेंनी कुटुंबीयांसह काढता पाय घेतला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours