मुंबई, 22 फेब्रुवारी : मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर येत्या तीन महिन्यांत दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला आहे. त्यामुळे मुंबईच्या गर्दीच्या रेल्वेस्थानकांवर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
गुप्तचर संघंटनांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर आता सुरक्षा यंत्रणाही अधिक तत्पर झाल्या आहेत. तर प्रवाशांनाही सहकार्य करण्याचं आवाहन केलं जात आहे.
मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमध्ये दररोज लाखो जण प्रवास करतात. सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा, संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, रेल्वे स्थानकांवर मेल-एक्स्प्रेसमध्ये शोध मोहीम, अशा प्रकारची खबरदारी आता घेतली जात आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्तचर विभागाने गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली आहे. यासंदर्भात गुजरात पोलिसांना माहिती देण्यात आली असून राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान ठार झाले होते.
गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. यात प्रमुख रेल्वे स्थानक, गुजरातची किनारपट्टी, स्टेच्यू ऑफ युनिटी, धार्मिक स्थळ आणि चित्रपटगृहांचा समावेश आहे. राज्य पोलिस दलाने या सर्व ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दहशतवादी गुजरातमध्ये असून त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours