मुंबई, 29 मे : डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणी 3 आरोपी महिला डॉक्टरांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पायलच्या आत्महत्येनंतर तिघीही फराऱ झाल्या होत्या. डॉ. हेमा आहुजा आणि डॉ अंकिता खंडेलवाल यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असून त्यावर बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. भक्ती मेहेर हिला मंगळवारीच अटक करण्यात आली होती.
गेल्या बुधवारी डॉ. पायल तडवी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि रॅगिंगविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पायलने नायर वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालयात प्रवेश घेतल्यापासून तिचा छळ केला जात होता. अखेरीस याचा मानसिक त्रास झाल्यानं पायलनं आत्महत्येचं पाऊल उचललं. 
चार डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई

नायर हॉस्पिलमधील स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. यी चिंग लिंग, वरिष्ठ निवासी डॉक्टर हेमा आहुजा, डॉ. भक्ती महिरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहा जणांच्या समितीची नेमणूक करण्यात आली होती. समितीने चौकशी करून दिलेल्या अहवालानंतर चारही डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.
महिला आयोगानेही मागवला अहवाल
दरम्यान, तडवी यांच्या आत्महत्येची दखल महिला आयोगाने घेतली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेश राज्य महिला आयोगाने नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णलयाला दिले आहेत. तरुण डॉक्टरला रॅगिंगमुळे आत्महत्या करावी लागणं हे दुर्दैवी असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर यांनी सांगितलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours