सांगली, 29 मे : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यानंतर आता पक्षातील नाराजांनी डोकं वर काढलं आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदार पक्ष सोडतील असं बोललं जात आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत पतंगराव कदम यांचे सुपुत्र आमदार विश्वजीत कदम हेदेखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. पण याबाबत आता स्वत: विश्वजीत कदम यांनी खुलासा केला आहे.
'मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत. भविष्यातही मी काँग्रेसमध्ये राहणार आहे,' असं खुलासा विश्वजीत कदम यांनी केला आहे. त्यामुळे सध्यातरी विश्वजीत कदम यांचा भाजप प्रवेश होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
जयंत पाटलांनाही भीती

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आघाडीतील काही आमदार भाजपमध्ये जातील, अशी भीती आता आघाडीचे नेतेही व्यक्त करत आहेत. 'भाजपला मिळालेल्या यशामुळे काही आमदार असा निर्णय़ घेऊ शकतात. यामध्ये कमी मताधिक्क्याने निवडून आलेले आमदार भाजपच्या जाळ्यात अडकतील,' असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. कमीत कमी आमदार जातील याकडे लक्ष ठेवून असल्याचंही जयंत पाटील सांगितलं.
लोकसभेनंतर 2019 च्या शेवटी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपने यासाठीची रणनिती आखण्यास आतापासूनच सुरुवात केल्याचं यावरून दिसतं. भाजपने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला खिंडार पाडून अनेक नेत्यांना पक्षात घेतलं होतं. तोच पॅटर्न विधानसभा निवडणुकीत वापरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना शह देण्याची शक्यता आहे.
संपूर्ण देशात लोकसभेत काँग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या आहेत. तर महाराष्ट्रातच भाजप-शिवसेना युतीने 41 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही नांदेडमधून पराभव झाला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours