रायगड, 6 जून : महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. देशभरातून शिवभक्त किल्ले रायगडावर रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करण्यासाठी दाखल झाले आहेत.
शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी मोठ्या उत्साहात पार पडत असतो. आजही दिवसभरात दोन लाखांहून अधिक शिवभक्त किल्ले रायगडावर येतील, असा अंदाज आहे. यावर्षी पहिल्यांदाच रायगडावर विदेशातील राजदूतही शिवराज्यभिषेक सोहळा पाहाण्यासाठी उपस्थित आहेत. उदयनराजे भोसले यांनी पहाटेच रायगडावरील राज सदरेमधील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर होळीच्या माळावरील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.
दुसरीकडे, युवराज संभाजीराजे छत्रपती राज सदरेत महाराजांच्या पुतळ्यावर अभिषेक करणार आहेत. महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाची जाणीव ठेवत यावेळी दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांनाही शिवराज्याभिषेक सोहळ्यात अभिषेक करण्याचा मान देण्यात येणार आहे. रयतेच्या राजाला रयतेकडून मानाचा मुजरा करण्यात येणार आहे.
दरम्यान, किल्ले रायगडावर जमलेल्या लाखो शिवभक्तांकडून 'जय भवानी जय शिवाजी' या जयघोषाने आज स्वराज्याची राजधानी दुमदुमणार आहे. नगारखाना, होळीचा माळ, जगदिश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ सर्वत्र जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय संभाजी महाराज असा जयघोष किल्ले रायगडावर ऐकायला मिळेल.
Post A Comment:
0 comments so far,add yours