मुंबई, 6 जून : बारावीनंतर आता दहावीचे विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच SSC म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल maharesult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवरून जाहीर होईल. शिवाय 'News18 Lokmat'च्या वेबसाइटवरही बोर्डाच्या परीक्षेचा निकाल अधिकृतपणे पाहता येणार आहे. काही वृत्तसंस्था आज दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचं वृत्त देत आहेत. पण News18 Lokmatशी बोलताना बोर्डाच्या अध्यक्षांनी याला दुजोरा दिलेला नाही. निकालाच्या तारखेसंदर्भातील अधिकृत  माहिती आल्यास आम्ही सर्वप्रथम तुमच्यापर्यंत ती नक्कीच पोहोचवू. दरम्यान,  10 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 7 किंवा 8 जूनला लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण बोर्डाच्या वतीने अद्याप निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता होती. हे लक्षात घेता 6 ते 8 जून दरम्यान निकाल लागू शकतो, असं म्हटलं जात आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल 28 मे रोजी दुपारी 1 वाजता बोर्डाच्या बेवसाइटवर लागला होता. त्याप्रमाणे 10 वीचा निकालसुद्धा दुपारी जाहीर होण्याची शक्यता आहे
या वर्षी बारावीचा निकाल 85 टक्के लागला आहे. मुलींनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी मारली. मुलांचा निकाल 82.40 टक्के तर मुलींचा निकाल 90.25 टक्के असा लागला आहे. यंदा 12 वीचा सर्वाधिक निकाल बोर्डाच्या कोकण विभागाचा लागला. कोकणचा निकाल 93. 23 टक्के तर सर्वांत कमी 82.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला.

काय टाळा? काय करा?
तज्ज्ञ सांगतात, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही परीक्षा देऊन झालीय. पेपरमध्ये जे लिहिलंय, ते बदलता येणार नाही. त्यामुळे रिझल्टच्या आधी टेन्शन घेऊ नका. सतत रिझल्टचा विचार करत बसू नका. त्याऐवजी आयुष्यात पुढे काय करायचंय त्याची तयारी करण्यावर भर द्या. दहावी, बारावीची परीक्षा हा एवढ्या मोठ्या आयुष्याचा भाग असतो. आयुष्य नव्हे. आयुष्य अनेक चांगल्या-वाईट घटनांनी घडत असतं. परीक्षेतले मार्क हे काही तुमचं अख्खं आयुष्य नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours