कोल्हापूर, 4 जुलै : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत कमबॅक करण्यासाठी राजू शेट्टी यांनी कंबर कसली आहे. राजू शेट्टी यांनी 'मिशन 49' ची घोषणा केली असून आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी 49 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.
'आघाडीबाबत अद्याप निर्णय झाला नसून पुढील महिन्यात होणाऱ्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत आघाडीत जायचं की नाही, याबाबतचा निर्णय घेऊ,' अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. राजू शेट्टींच्या या नव्या भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गोटात चिंता निर्माण झाली आहे. कारण आधीच लोकसभा निवडणुकीत राज्यात आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. त्यात विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टींनी साथ सोडल्यास तो आघाडीसाठी मोठा धक्का असेल.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील 10 वर्षांपासून खासदार असलेले शेतकरी नेते राजू शेट्टी यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीत सर्वांना आश्चर्याचा धक्का देत शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला. गेल्या निवडणुकीत राजू शेट्टी यांचा पक्ष भाजपसोबत होता. पण ही निवडणूक मात्र त्यांनी आघाडीसोबत लढवली.
दरम्यान, आणखी एका पक्षाने महाआघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. 'विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला सन्मानजनक वागणूक द्यावी. आम्हाला कमीत-कमी 10 जागा हव्या आहेत. या जागा न दिल्यास आम्ही 50 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवू,' असा इशारा रिपाइंचे (गवई गट)नेते राजेंद्र गवई यांनी दिला आहे. त्यामुळे आघाडीच्या अडचणींत भर पडली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours