मुंबई, 25 ऑगस्ट: महाराष्ट्रात विकेंण्डला पुन्हा एकदा पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता. तर काही भागांमध्ये ऊन पावसाचा लपंडाव सुरू होता. पुढील 4 दिवस म्हणजेच 25 ते 28 ऑगस्ट पुन्हा पाऊस सक्रीय होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 25 ऑगस्टला विदर्भात काही भागांत अति मुसळधार तर मध्य महाराष्ट्र, कोकणात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याच दरम्यान समुद्रात भरती असल्यानं साधारण 4.90 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टीवर जोरादार वारा असल्यानं मच्छिमारांसह पर्यटकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्र खवळलेल्या असल्यानं समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये प्रशासनाकडून मच्छिमारांना सूचनाही देण्यात आल्या आहे.
एका बाजूला पावसाचा पुन्हा आगमन होत आहे तर दुसरीकडे सोलापूर, बीड, जालना, परभणी जिल्ह्यांमध्ये तापमानात कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे अहमदनगर, औरंगाबाद इथे कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जात आहे.पाथर्डी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती हटवण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग यशस्वी झाला. विमानांनी ढगांवर रसायनाची फवारणी केल्याने तालुक्यातील पूर्व दक्षिण भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.यंदा जूननंतर समाधानकारक पाऊस पडला नाही. जूनच्या सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशी, बाजरी, मका आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली असली तरी तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळ कायम आहे. अद्याप अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे तालुक्यामध्ये पावसाअभावी शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
पावसाअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी औरंगाबाद येथील विमानतळावरून तालुक्यात प्रथमच कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. यासाठी बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरावरील जमा झालेल्या ढगांवर सुमारे एक तास विमानातून रसायनाची फवारणी करण्यात आली. परंतु वाऱ्याचा वेग जास्त प्रमाणावर असल्यामुळे रसायनांची फवारणी केलेले ढग मोहटा गावापासून पूर्व बाजूला सरकले. यामुळे करोडी, तिनखडी, मोहटा, कोरडगाव, भिलवडी, मोहजदेवढे, पिंपळगाव, टाकळीमानुर तसेच बीड जिल्ह्यातील शिरूरपर्यंत दमदार पावसाची सुरुवात झाली होती. कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्याने येत्या कालावधीत अशा स्वरूपाचा प्रयोग पाथर्डी तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी राबवण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours