औरंगाबाद, 25 ऑगस्ट- शहरात दिवसेंदिवस मंगळसूत्र चोरांची दहशत वाढत चालली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तीन महिलांना टार्गेट करून त्यांच्या गळ्यातीस मंगळसूत्र लांबवले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अवघ्या तासभरात शहरातील तीन ठिकाणी मंगळसूत्रे लांबवत चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. हे चोरटे नागरिकांसमोरुन अगदी सहज निघून जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. मुळात यावेळी नागरिकांनी सतर्कतेची भूमिका बजावायला हवी होती. पण, त्यांनी बघ्याची भूमिका घेतलेने चोरटे मस्तावल्याचे कॅमेरातील फुटेजमुळे दिसून आले. दिवसाढवळ्या भररस्त्यावर गुन्हे घडण्याची संख्या वाढली आहे.
शनिवारी सकाळी चेहऱ्यावर रूमाल बांधून दुचाकीवर आलेल्या दोघांनी तीन महिलांची मंगळसूत्रे लांबवली. त्यापैकी दोन महिलांची मंगळसूत्रे चोरांच्या हाती लागली. तर एका महिलेचे मंगळसूत्र लहान असल्याने ते चोरट्यांच्या हाती लागले नाही. पहिली घटना सकाळी नऊच्या सुमारास भानुदास नगरजवळ घडली. तनूजा विपुलचंद कंदी ही महिला पतीसोबत आकाशवाणीकडून घराकडे दुचाकीने जात होली. यावेळी त्यांचा पाठलाग करत दुचाकीवरून आलेल्या चोरांनी तनूजा यांच्या गळ्यातील अठरा ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले. यावेळी सतर्क असलेल्या तनूजा यांनी मंगळसूत्र हातात पकडल्यामुळे ते तुटून चोरांच्या हाती अकरा ग्रॅमचे सोने लागले. उर्वरीत सात ग्रॅम तनूजा यांच्या हातात राहिले. ही घटना घडल्यानंतर तनूजा आणि विपुलचंद यांनी जवाहरनगर पोलिस ठाणे गाठत माहिती दिली. याप्रकरणाची चौकशी सुरू असतानाच पावणेदहाच्या सुमारास दुसरी घटना सहकार नगरजवळील एसबीएच कॉलनीत नाल्याच्या कॉर्नरवर घडली.
जयश्री संदीप देवगावकर या जागृती हायस्कूलमध्ये शिक्षिका आहेत. सकाळी मुलाला आयकॉन इंग्लिश शाळेत सोडल्यानंतर त्या दुचाकीने घराकडे निघाल्या होत्या. यावेळी दुचाकीस्वार दोन्ही चोरांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. शाळेपासून थोड्या अंतरावर चोरांचा मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न फसला. फसलेला प्रयत्न यशस्वी करण्यासाठी चोरांनी पुन्हा पाठलाग सुरू केला. दुस-या प्रयत्नात मात्र चोरट्यांनी जयश्री यांची दुचाकी अडवली. त्यांच्या गळ्यातील सतरा ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले. यावेळी एक रिक्षाचालक बघ्याच्या भूमिकेत होता. जयश्री यांनी आरडाओरड करताना हा रिक्षाचालक मदतीला धावून गेला नाही. हा प्रकार घडल्यानंतर जयश्री यांनी उस्मानपुरा पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.
याप्रकारानंतर दुचाकीस्वार चोरांनी सातारा परिसरातील बीडबायपासच्या दिशेने मोर्चा वळवला. सकाळी सव्वादहा ते साडेदहाच्या सुमारास महिलेचे दोन ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले. मनिषा अनिल सोमवंशी यांच्या पतीचे अयप्पा मंदिराजवळील धावडा कॉम्पलेक्समध्ये इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. दररोज सकाळी त्या पतीला कामात मदत करण्यासाठी जातात. शनिवारी नेहमीप्रमाणे त्या पायी दुचाकीकडे जात असताना दोघांनी त्यांचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे मंगळसूत्र लहान असल्याने त चोरट्यांच्या हाती लागले नाही. मंगळसूत्र तुटून खाली पडताच चोरांनी तेथून धूम ठोकली. यावेळी देखील काही तरुण घटनास्थळी उपस्थित होते. एकाच दिवशी अशा तीन घटना घडल्याने महिलमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours